दोहाच्या वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आज एसीसी मेन्स आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत ‘ए’ आणि पाकिस्तान ‘ए’ यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यात टॉस जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशात लयात असलेल्या भारतीय गोलंदाजांकडून मागील सामन्याप्रमाणे कामगिरीची अपेक्षा आहे.
भारताच्या खेळाडूंचा विचार करता, सध्या पहिल्या फळीपासून अखेरच्या फळीपर्यंत खेळपट्टीवर टिकतील अशा बॅटर्सचा भरणा आहे. त्यात वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, मागील सामन्यातील शतकवीर कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र अशा खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान, नेपाळविरुद्ध म्हणावी तशी कामगिरी करू न शकलेल्या वैभव सूर्यवंशीकडे साऱ्यांच्या नजरा असतील. तसेच अभिषेक शर्माही नेपाळविरुद्ध म्हणावी तशी बॅटिंग करू शकला नव्हता. त्यामुळे ही दोघे सलामीला येत काय धमाका करतात, ते पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हर्षित राणा व प्रिन्स यादव ठरणार हुकुमी एक्के
गोलंदाजीत हर्षित राणा आणि प्रिन्स यादव या बॉलर्सकडून मागील सामन्यातील कामगिरीच्या पुनरावृत्तीची जबाबदारी असणार आहे. या दोघांनी नेपाळच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडत अवघ्या २६ धावांत गारद केले होते. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध हे कशाप्रकारे कामगिरी करतात, ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या साथीला शाहबाज अहमद आणि विपराज निगम हे देखील असणार आहेत.
भारताने गटफेरीतील पहिल्या सामन्यात नेपाळचा तब्बल ३०६ धावांनी पराभव करत गुणतालिकेतील अव्वल स्थान गाठले आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना नेपाळसमोर ९ बाद ३३३ धावांचे आव्हान दिले होते. त्या धावांचा पाठलाग करताना भारताने नेपाळला १२ व्या ओव्हर्समध्येच २६ धावांत गारद केले. तर पाकिस्तानला पहिल्या सामन्यात युएईने चांगलेच रडवले. युएईने पाकिस्तानला २४५ धावांतच गारद केले, तर या धावांचा पाठलाग करताना युएईच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम गाळला. अखेर त्यांनी हा सामना ६१ धावांनी जिंकला, पण युएईच्या रायझिंग स्टार्स खेळाडूंसमोर ते थोडे दबावात गेले होते.
हे आहेत संघ
भारत ‘ए’ संघ: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, आयुष बडोनी, तिलक वर्मा (कर्णधार), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्षित राणा, प्रिन्स यादव, तनुष कोटियन, प्रभसिमरन सिंग, हर्ष दुबे आणि अर्शद खान.
पाकिस्तान ‘ए’ संघ: शमिल हुसेन, माज सदाकत, रोहेल नझीर (यष्टीरक्षक), हसन नवाज, अब्दुल समद (कर्णधार), फरहान युसूफ, साद मसूद, मोहम्मद इम्रान रंधावा, अहमद दानियाल, सुफियान मुकिम, अली रझा, शहजैब खान, हैदर अली, मोहम्मद हसनैन आणि दानिश अझीझ.
Leave a Reply