पुण्यातील लोणी काळभोर भागात एका शैक्षणिक संस्थेच्या इमारतीत १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी लिफ्टमध्ये तब्बल १४ तास अडकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वाघोली येथे राहणारी ही तरुणी लोणी काळभोरमधील एका नामवंत शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. १७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास ती घरी निघाली होती. इमारतीतील लिफ्टमधून ती तळमजल्यावर येत होती. त्यावेळी वीजपुरवठा खंडित झाला आणि लिफ्ट पाचव्या व सहाव्या मजल्याच्या मधोमध अडकली.
रात्रभर अंधारात, अन्न-पाण्याविना
तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी तसेच कर्मचारी बाहेर पडल्याने तिचा आवाज कोणाला ऐकू आला नाही. रात्रभर ती अंधारात होती. अन्न-पाण्याविना तिने लिफ्टमध्ये रात्र काढली.
दरम्यान, मुलगी घरी न आल्याने तिचे पालक चिंतेत पडले. त्यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही.
पहाटे सहा वाजता सुखरूप सुटका
दुसऱ्या दिवशी सकाळी सहाच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. तळमजल्यावर थांबलेल्या एका महिलेने लिफ्टचे बटण दाबले. लिफ्ट सुरू झाल्यानंतर ती तळमजल्यावर आली. तरुणी भेदरलेल्या अवस्थेत लिफ्टमध्ये होती. तिला धीर देण्यात आला. तेव्हा तिने १४ तास लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती दिली.
लिफ्टमधून ती सुखरूप बाहेर पडल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला. आमची कोणाबाबत तक्रार नाही, असे पालकांनी सांगितले. मात्र, या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. तांत्रिक जबाबदारी कोणाची आहे, याबाबत चौकशी करण्यात येणार आहे, असे लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक समाधान पवार यांनी सांगितले.
Leave a Reply