नागपूरच्या वर्धा रोडवर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे रोजच्या प्रवासात मोठी अडचण निर्माण झाली आहे. चिंचभुवन ते मिहान इंटरचेंजदरम्यान बांधला जाणारा हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत या मार्गावरून जाणाऱ्या हजारो प्रवाशांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
बांधकामासाठी रस्त्याच्या काही भागात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांसाठी उपलब्ध असलेली जागा कमी झाली आहे. लांबचा यू-टर्न घेण्याची कसरत टाळण्यासाठी अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने चालवत आहेत. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याची शक्यता वाढली आहे. या मार्गावर दुकाने, व्यावसायिक आस्थापने, शाळा आणि विविध संस्था असल्याने येथून जाणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे.
२० मिनिटांचा प्रवास आता ४५ मिनिटांचा
वर्धा रोडवर उड्डाणपुलासोबतच मेट्रोचे बांधकामही सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. नागपूर ते बुटीबोरी हा प्रवास पूर्वी साधारण २० मिनिटांत पूर्ण होत होता. आता याच अंतरासाठी जवळपास ४५ मिनिटे लागत असल्याची तक्रार नियमित प्रवासी करीत आहेत. चिंचभुवन ते मिहान इंटरचेंजदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
नागपूरला वर्धा, चंद्रपूर, हैदराबाद, यवतमाळ आणि मुंबईशी जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथील वाहतूक कोंडीचा परिणाम हजारो प्रवाशांवर होत आहे. बांधकाम सुरू झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतुकीसाठी दुभाजक हटवून सर्व्हिस रोड मुख्य महामार्गाला जोडला होता. मात्र, या व्यवस्थेचा योग्य वापर न करता काही वाहनचालक राँग साईडने प्रवास करीत आहेत.
६१९ कोटींचा प्रकल्प नोव्हेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार
चिंचभुवन-मिहान इंटरचेंज उड्डाणपुलाची लांबी सुमारे २.६ किलोमीटर असून, हा सहापदरी प्रकल्प आहे. त्यासाठी ६१९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बहुतांश खांबांचे बांधकाम पूर्ण झाले असून, मिहान इंटरचेंजच्या दिशेने गर्डरचे सेगमेंट बसवण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. नोव्हेंबर २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मात्र, बांधकाम पूर्ण होण्यास अद्याप वेळ असल्याने तोपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजन, नियमित पोलीस बंदोबस्त आणि राँग साईड वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांची अनियमित उपस्थिती हीदेखील या मार्गावरील एक मोठी अडचण ठरत आहे.
Leave a Reply