राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेने पुण्यात ‘फूड स्कॉलरशिप’ हा उपक्रम सुरू केला आहे. पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत दोन वेळचे मोफत जेवण दिले जाणार आहे. प्रा. सचिन सानप यांनी ही माहिती दिली.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो विद्यार्थी येतात. अकरावीपासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण येथे राहतात. मात्र दुष्काळामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावली असून, घरून मदत मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर जेवणाचाही प्रश्न उभा राहिला आहे.
कोठे मिळणार जेवण?
सदाशिव पेठ, एकलव्य अभ्यासिका (गांजवे चौक), शिवाजीनगर गावठाण आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात जेवण दिले जाणार आहे. गरज आणि प्रतिसाद पाहून भोजन केंद्रांची संख्या वाढवली जाणार असल्याचे सानप यांनी सांगितले.
कोण पात्र, निवड कशी होणार?
अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी या उपक्रमासाठी पात्र असतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येणार आहे. मुलाखत आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पाहून निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र ओळखपत्र दिले जाईल. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार निवड होणार असून, सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.
या विद्यार्थ्यांना विशेष प्राधान्य
एकल पाल्य असलेल्या मुली, अनाथ आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना या उपक्रमात विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. नोंदणीसाठी सौरभ काळुशे (७७७५८४१९१९) आणि रणजीत पवार (९०७५३३९६५१) यांच्याशी संपर्क साधता येईल. पत्ता: एकलव्य अभ्यासिका आणि हॉस्टेल, रामचंद्र अपार्टमेंट, ५८६, केळकर रोड, नारायण पेठ पोलीस चौकीजवळ, पुणे.
Leave a Reply