खोटं कोण जास्त बोलतं — पुरुष की महिला? हा प्रश्न अनेकदा चर्चेत येतो आणि त्यावर प्रत्येकाचं स्वतःचं मत असतं. आता याच प्रश्नावर झालेल्या एका नव्या संशोधनातून धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पोर्टसमाउथ विद्यापीठात झालेल्या या अभ्यासात स्त्री आणि पुरुष खोटं का बोलतात, यामागची कारणंही वेगवेगळी असल्याचं दिसून आलं आहे.
अभ्यासात असं आढळलं की, पुरुष स्वतःला खोटं बोलण्यात आणि खोटं लपवण्यात महिलांपेक्षा दुप्पट चांगला मानतात. म्हणजेच खोटं बोलण्याच्या कौशल्याबाबत पुरुषांचा स्वतःबद्दलचा विश्वास महिलांपेक्षा कितीतरी जास्त आहे.
खोटं बोलण्यामागची कारणं वेगळी
स्त्री आणि पुरुष खोटं का बोलतात, याची कारणं मात्र वेगळी असल्याचं अभ्यासात समोर आलं आहे. आपल्या चुका लपवण्यासाठी, स्वतःची प्रतिष्ठा राखण्यासाठी, जबाबदाऱ्या टाळण्यासाठी आणि संघर्षापासून दूर राहण्यासाठी लोक खोटं बोलतात. ही कारणं दोघांमध्येही दिसून येतात.
मात्र महिलांच्या बाबतीत खोटं बोलण्यामागचं कारण काहीसं वेगळं असल्याचं अभ्यास सांगतो. नाती टिकवण्यासाठी आणि भावनिक सुरक्षितता जपण्यासाठी महिला खोटं बोलतात, असं निरीक्षण अभ्यासात नोंदवण्यात आलं आहे. म्हणजेच खोटं बोलण्यामागे नातेसंबंध आणि भावना हे महत्त्वाचे घटक ठरतात.
खोटं बोलणं हा मानवी स्वभावाचा भाग
या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट होते की, खोटं बोलणं हे केवळ एका लिंगापुरतं मर्यादित नाही. स्त्री आणि पुरुष दोघेही खोटं बोलतात, फक्त त्यामागची कारणं आणि त्याबद्दलचा त्यांचा स्वतःचा समज वेगवेगळा असतो. काही जण चुका लपवण्यासाठी खोटं बोलतात, तर काही जण नातं टिकवण्यासाठी खोटं बोलण्याचा मार्ग निवडतात.
अभ्यासाचे निष्कर्ष चर्चेत आले असून, खोटं बोलण्याच्या सवयीवर आणि त्यामागच्या मानसिकतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Leave a Reply