२०१८ मधील सँडपेपरगेट प्रकरणावरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. अनुभवी फलंदाज उस्मान ख्वाजा याने आपल्या ‘सब्र’ या पुस्तकात या प्रकरणाबाबत केलेल्या दाव्यांमुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. या दाव्यांनंतर ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू दोन गटांत विभागले गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कमिन्सने आरोप फेटाळले
ख्वाजा यांनी आपल्या पुस्तकात २०१८ मधील चेंडूशी छेडछाड प्रकरणाबाबत संपूर्ण संघाला आधीच माहिती असल्याचा दावा केला आहे. मात्र, कर्णधार पॅट कमिन्सने हे आरोप फेटाळून लावले आहेत. जवळपास तासभर चाललेल्या पत्रकार परिषदेत त्याने आपली भूमिका मांडली. संघातील कोणत्याही खेळाडूला या प्रकरणाची आधी माहिती असती, तर त्याचवेळी हस्तक्षेप केला असता, असं कमिन्सने स्पष्ट केलं.
हेझलवूडचा कमिन्सला ठाम पाठिंबा
वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडनेही कमिन्सला पाठिंबा दिला आहे. ‘न्यूज कॉर्प’शी बोलताना त्याने २०१८ मधील प्रकरणाबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असं स्पष्ट केलं. गेल्या दोन आठवड्यांपासून तो सिडनीमध्ये कमिन्ससोबत सराव करत आहे. कमिन्सच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचंही त्याने सांगितलं.
हेझलवूड म्हणाला की, गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या बाजूंनी खूप दबाव निर्माण झाला आहे, पण तो पॅटच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. पत्रकार परिषदेत कमिन्सने मांडलेली भूमिका आणि कर्णधार म्हणून गेल्या काही वर्षांत त्याने केलेलं काम यालाही आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं त्याने सांगितलं.
कमिन्स कर्णधार नसतील तर पुढे काय?
हेझलवूडने कमिन्सच्या नेतृत्वाचं कौतुक करताना एक महत्त्वाचं विधान केलं. सँडपेपर प्रकरणानंतर पॅटने संघाला ज्या उंचीवर नेलं आहे, ते उल्लेखनीय असल्याचं तो म्हणाला. तो एक उत्कृष्ट कर्णधार असल्याचंही त्याने सांगितलं. जर पहिल्या कसोटीसाठी संघ मैदानात उतरला आणि पॅट कर्णधार नसेल, तर पुढे काय होईल हे माहीत नाही, असं हेझलवूड म्हणाला. त्याच्या या विधानामुळे कमिन्सला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेतल्यास हेझलवूडही आपल्या भविष्याबाबत पुनर्विचार करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे.
हेझलवूडने ख्वाजांचा दावाही फेटाळून लावला. घटनेनंतर अवघे दोन ते तीन दिवस झाले होते, त्यामुळे त्यावेळी सर्व तपशील स्मरणात ताजे होते, असं तो म्हणाला. चेंडूशी छेडछाड करण्याच्या नियोजनात आपली काही भूमिका होती का, आणि मैदानात सँडपेपर किंवा इतर कोणतीही बाह्य वस्तू वापरली जात आहे याची माहिती होती का, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही अशीच असल्याचं त्याने स्पष्ट केलं.
Leave a Reply