तुम्ही तुमची कार किंवा दुचाकी चालवताना त्यावर जातीशी संबंधित एखादा शब्द, नाव किंवा चिन्ह लिहित असाल, तर आता तुमच्यावर कारवाई होऊ शकते. गुजरात सरकारने खासगी वाहनांवर जात दर्शवणारे फलक, स्टिकर्स किंवा कोणत्याही प्रकारचे लेखन वापरण्यावर बंदी घातली आहे. यासंदर्भात सरकारने १७ नोव्हेंबर रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
नियमांत नेमका काय बदल?
नवीन नियमांनुसार, खासगी वाहनांवर जातीशी संबंधित कोणतेही फलक किंवा मजकूर प्रदर्शित करण्यास आता परवानगी नसणार आहे. गुजरात सरकारने १७ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी करत मोटार वाहन नियमांमध्ये बदल केले आहेत. गुजरात मोटार वाहन नियमांमधील नियम १२५(१) मध्ये सुधारणा करून त्यात जातिदर्शक चिन्हे, म्हणजेच एखाद्याच्या जातीचा बोध करून देणारे शब्द किंवा चिन्हे यांचा समावेश करण्यात आला आहे. यासह नियम १३८ अंतर्गत एक नवीन उप-नियम (३) जोडण्यात आला आहे. यात स्पष्टपणे नमूद केले आहे की, राज्य सरकारने दिलेल्या सवलतींशिवाय कोणत्याही खासगी वाहनावर जाहिरातींशी संबंधित साधने, जातीशी संबंधित चिन्हे, प्रतिमा किंवा मजकूर प्रदर्शित करता येणार नाहीत. कोणताही व्यक्ती आपल्या कारवर किंवा बाईकवर जातीचा उल्लेख करणारे स्टिकर लावत असेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल.
अंमलबजावणी आणि सवलती
या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी आगामी काळात राज्यातील सर्व आरटीओ आणि पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. दरम्यान, राज्य सरकार सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे काही प्रकरणांमध्ये सवलती देऊ शकते. वाहनाच्या नंबर प्लेट्सवर कोणत्याही प्रकारचे स्टिकर लावणे किंवा त्यामध्ये फेरफार करण्यास आधीपासूनच मनाई आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम ३९ नुसार, नोंदणी क्रमांकाच्या पाट्यांशी छेडछाड करणे किंवा नियमांचे उल्लंघन होईल अशा प्रकारे त्यात बदल करणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारचे उल्लंघन केल्यास कलम १९२ अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. गुजरात सरकारने केलेल्या नवीन दुरुस्तीनुसार, खासगी वाहनांवर जातीशी संबंधित चिन्हे किंवा उल्लेख प्रदर्शित करण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आली आहे.
Leave a Reply