राज्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळत असताना सरकारकडून मिळणारे स्वस्त रेशन गोरगरीब जनतेला मदत करते. मात्र या रेशन पुरवठ्यातही अनेक गैरप्रकार होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. असाच धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यातून समोर आला आहे.
## नेमके प्रकरण काय?
जिवंत व्यक्तींच्या हक्काचे रेशन मिळविण्यासाठी अनेकांना प्रतीक्षा करावी लागत असताना जिल्ह्यात तब्बल सात हजार २०० मृत व्यक्तींच्या नावावर रेशनची उचल होत असल्याचे उघड झाले. जिल्ह्यातील शिधापत्रिकांच्या पडताळणीसाठी राबविण्यात आलेल्या ‘मिशन सुधार’ मध्ये ही बाब समोर आली. मृत व्यक्तींची नावे, दुबार नोंदी आणि चुकीचे आधार क्रमांक अशा विविध त्रुटी आढळल्याने जिल्ह्यातील एकूण १० हजार ८९४ नावे शिधापत्रिकांमधून कमी करण्यात आली आहेत. ‘मिशन सुधार’मुळे अशा अनियमित नोंदी हटविण्यास मदत झाली असून, पात्र लाभार्थ्यांनाच शासकीय धान्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र मृतांच्या नावावर किती काळ आणि किती प्रमाणात धान्याची उचल झाली, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
## मिशन सुधार म्हणजे काय?
मिशन सुधार ही महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राबविण्यात येणारी शिधापत्रिका पडताळणी व सुधारणा मोहीम आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश अपात्र, दुबार किंवा मृत लाभार्थ्यांची नावे वगळून खऱ्या व पात्र लाभार्थ्यांपर्यंत रेशनचे धान्य पोहोचवणे हा आहे. गरिबांच्या हक्काच्या रेशनवर डल्ला मारला जात असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply