लक्ष्मी, सरस्वती आणि भवानी मातेची पूजा करणारा समाज घरातील महिलांना मात्र आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण आणि निर्णयाचे अधिकार देताना मागे का राहतो, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. महिलांना केवळ देवतेच्या भूमिकेत न ठेवता प्रत्येक क्षेत्रात समान संधी देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
समाजातील विरोधाभासावर बोट
संपत्तीची देवता म्हणून लक्ष्मीची पूजा करायची, पण घरातील महिलेला आर्थिक अधिकार द्यायचे नाहीत. सरस्वतीची पूजा करायची, मात्र घरातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आला की लग्नाचे कारण पुढे करायचे. भवानी मातेचा जयघोष करायचा, पण प्रत्यक्षात महिलांना घरातच बसण्याचा सल्ला द्यायचा. समाजातील याच विरोधाभासावर भुजबळ यांनी बोट ठेवत संताप व्यक्त केला.
महिलांना शिक्षण, नोकरी, प्रशासन, राजकारण आणि सैन्य अशा प्रत्येक क्षेत्रात समान संधी देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या देशांनी महिलांना बरोबरीने काम करण्याची संधी दिली, ते देश पुढे गेले. मात्र महिलांची ५० टक्के मानवी ताकद घरातच मर्यादित ठेवणारे देश मागे राहिले, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
फुले दांपत्याच्या विचारांचा दाखला
राजीव गांधी, नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांनी महिलांच्या शिक्षण आणि आरक्षणासाठी घेतलेल्या भूमिकांचाही त्यांनी उल्लेख केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा दाखला देत महिलांना समान संधी द्यायला पाहिजे, असे भुजबळ म्हणाले. ते जुन्नरमध्ये बोलत होते.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि भुजबळ यांच्यामध्ये बैठकही झाली. या बैठकीबाबत बोलताना कोल्हे म्हणाले की, राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाल्या नाहीत, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली. फुले यांच्या मालिकेसंदर्भात भुजबळ यांची भेट झाली असून त्यांनी मालिकेसाठी मोठे पाठबळ दिले आहे. यापुढेही भुजबळ यांची भेट झाली तर ती मालिकेसाठीच झाली असे समजावे, असे कोल्हे म्हणाले.
Leave a Reply