भारतात शंभर रुपयांत भाजीपाला, दूध आणि काही दैनंदिन वस्तू खरेदी करता येतात. पण लंडनसारख्या महागड्या शहरात याच रकमेत काय मिळू शकते, याची कल्पना अनेकांना नसेल. याच विषयावरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये एक भारतीय तरुणी हातात शंभर रुपयांची नोट घेऊन लंडनमधील एका सुपरमार्केटमध्ये गेली आणि त्या रकमेत तिला काय काय खरेदी करता आले, हे तिने दाखवले. विनिमय दरानुसार भारतीय शंभर रुपयांची किंमत इंग्लंडच्या चलनात ०.८३ पाऊंड इतकी आहे. या व्हिडिओतून दोन्ही देशांमधील महागाईतील तफावतही समोर आली आहे.
सँडविच आणि पाण्याची बाटलीही बजेटबाहेर
सुपरमार्केटमध्ये गेल्यावर ती तरुणी सगळ्यात आधी खाद्यपदार्थांकडे वळली. चीज अँड ओनियन सँडविचची किंमत दीड पाऊंड असल्याने तो शंभर रुपयांत घेणे अशक्य होते. त्यानंतर किमान पाचशे मिलिलिटर पाण्याची बाटली तरी शंभर रुपयांत मिळेल, असा तिचा अंदाज होता. पण पाण्याच्या बाटलीची किंमत १.१५ पाऊंड होती, म्हणजे भारतीय चलनात सुमारे १४३ रुपये. साधी पाण्याची बाटलीही तिच्या बजेटमध्ये बसत नसल्याचे पाहून तिला धक्काच बसला.
कोबी आणि ओरियो बिस्किटही महाग
मग तिने मोर्चा भाज्या आणि स्नॅक्सकडे वळवला. तिथे पत्ता कोबीचे पॅकेट ०.८९ पाऊंड इतके होते. हा दर शंभर रुपयांपेक्षा किंचित जास्त होता. सगळ्यांचे आवडते ओरियो बिस्किटही तिला घेता आले नाही, कारण त्याची किंमत १.६५ पाऊंड होती. यामुळे लंडन आणि भारतातील महागाईमधील फरक अगदी स्पष्टपणे समोर आला.
शेवटी हाती लागले केवळ गाजर
संपूर्ण दुकानात फेरफटका मारल्यानंतर तिची नजर गाजराच्या पॅकेटवर पडली. त्याची किंमत ०.६ पाऊंड, म्हणजे ७५ रुपये इतकी होती. ही रक्कम तिच्या बजेटमध्ये बसत होती. त्यामुळे तिने गाजर खरेदीवर समाधान मानले. हा व्हिडिओ मनोरंजनासाठी शूट केला असला, तरी भारत आणि इंग्लंडमधील महागाई, विनिमय दर आणि राहणीमान याबद्दल तो मोठे भाष्य करणारा ठरला आहे.
Leave a Reply