कपडे स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. मात्र मशीनमध्येच धुतलेले कपडे नीट स्वच्छ होत नसतील किंवा त्यांना दुर्गंधी येत असेल, तर मशीन स्वच्छ आहे का याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिनोमहिने कपडे धुण्यासाठी मशीन वापरल्याने त्यात डिटर्जंट, कपड्यांचे धागे, धूळ आणि ओलावा साचून राहतो. त्यामुळे बुरशी आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. मशीनची नियमित स्वच्छता केल्यास कपडे ताजे राहतात आणि मशीनही दीर्घकाळ चांगली चालते.
## कोमट पाण्याने स्वच्छ धुवा
महिन्यातून किमान एकदा वॉशिंग मशीन रिकामी ठेवून कोमट किंवा गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावी. यामुळे मशीनचा ड्रम आणि पाईप्समध्ये साचलेले डिटर्जंट, तेलकटपणा आणि बॅक्टेरिया कमी होण्यास मदत होते. ही सर्वात सोपी आणि प्रभावी सवय आहे.
## रबरी डोअर सील स्वच्छ करा
फ्रंट-लोड वॉशिंग मशीनमध्ये रबरी डोअर सील असते. त्याच्या घड्यांमध्ये केस, डिटर्जंट आणि ओलावा सहज जमा होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास तिथे बुरशी आणि घाण वाढू शकते. हा भाग साबणाच्या पाण्याने किंवा योग्य क्लिन्झरने आणि कापडाने स्वच्छ पुसून घ्यावा.
## डिटर्जंटचा ड्रॉवर स्वच्छ करा
वॉशिंग मशीनमधील डिटर्जंट ड्रॉवर काढून स्वच्छ करणे शक्य असल्यास तो काढून कोमट साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवावा. कोपऱ्यातील आणि आतली घाण काढण्यासाठी लहान ब्रशचा वापर करावा आणि ड्रॉवर कोरडा करून पुन्हा बसवावा.
## दरवाजा उघडा ठेवा आणि फिल्टर स्वच्छ करा
वॉशिंग मशीनमधून ओलावा बाहेर पडू शकत नसल्यामुळे आतमध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू शकतो. त्यामुळे कपडे धुवून झाल्यानंतर मशीनचा दरवाजा काही वेळ उघडा ठेवावा, जेणेकरून आतील भाग कोरडा राहील. मशीनमध्ये सहसा एक ड्रेन फिल्टर असतो, जो केस आणि कचरा गोळा करतो. फिल्टर चोक झाल्यास साचलेले पाणी जमा होते आणि दुर्गंधी येते. त्यासाठी दर महिन्यांनी फिल्टर काढून स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. या पाच सोप्या सवयी पाळल्यास मशीन स्वच्छ राहते आणि कपड्यांनाही ताजेपणा टिकून राहतो.
Leave a Reply