पुणे महापालिकेने अतिक्रमणाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर लक्ष्मी रस्त्यावर कारवाई सुरू केली. मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे ही कारवाई तिसऱ्याच दिवशी अर्धवट थांबवावी लागली. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारवाईबाबत शंका निर्माण झाली आहे.
आयुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई अर्धवट
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अतिक्रमणांविरोधात नगरसेवकांनी आवाज उठवला होता. प्रशासनावर झालेल्या जोरदार टिकेनंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे ‘अॅक्शन मोड’वर आले. त्यांनी मैदानात उतरून पुढील महिनाभर महापालिकेचा बुलडोझर चालणार असल्याचे सांगितले आणि कोणताही दबाव सहन करू नका, असा आदेश अधिकाऱ्यांना दिला. कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईतच महापालिकेच्या बुलडोझरला ब्रेक लागला.
शहरातील इमारतींच्या फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमध्ये करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे हटविण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यानंतर प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर कारवाईला सुरुवात केली. बेलबाग चौकातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष कारवाईदरम्यान अनधिकृत बांधकामे आणि पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्याऐवजी दुकानांचे फलक काढण्यावरच प्रशासनाचा भर राहिल्याचे चित्र दिसून आले.
लक्ष्मी रस्त्यावर अनेक ठिकाणी इमारतींच्या पार्किंगच्या जागांमध्ये दुकाने थाटण्यात आली आहेत. काही ठिकाणी फ्रंट मार्जिन आणि साईड मार्जिनमध्ये कायमस्वरूपी स्वरूपाची बांधकामे करण्यात आली आहेत. व्यापाऱ्यांनी कारवाईला विरोध केला आणि राजकीय हस्तक्षेपाचे प्रयत्न झाल्यामुळे ही कारवाई अर्धवट थांबवण्यात आली.
सभागृहात पडसाद
लक्ष्मी रस्त्यावर अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असतानाच महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू होती. कारवाई सुरू झाल्याची माहिती सभागृहातील काही नगरसेवकांना मिळाली. त्यानंतर या कारवाईबाबत वरिष्ठ नेत्यांना माहिती देण्यात आली. कारवाई थांबवण्यासाठी काही लोकांकडून प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. या घडामोडींमुळे सर्वसाधारण सभेतील कामकाजही काही काळ प्रभावित झाले. सुमारे वीस मिनिटे सभागृहात कोणतीही चर्चा झाली नाही. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे दूरध्वनी येऊ लागल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लक्ष्मी रस्त्यावरील कारवाई अर्धवट थांबवण्यात आली.
लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईदरम्यान काही ठिकाणी पार्किंगच्या जागांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी पार्किंगच्या जागांमध्ये सुरू असलेल्या दुकानांबाबत ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या अतिक्रमणांकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार होणाऱ्या कारवाईच्या अंमलबजावणीबाबतच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Leave a Reply