शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जिल्हा बँकांच्या सत्तेवरून महायुतीत कलगीतुरा; भाजप नाराज

सातारा जिल्हा बँकेच्या सत्तेवरून महायुतीत धुसफूस उघड झाली आहे. भंडारा आणि जळगावातही मित्रपक्षांत संघर्ष सुरू असून समन्वय समिती असूनही फाटाफूट दिसून येते.

जिल्हा बँकांच्या सत्तेवरून महायुतीत कलगीतुरा; भाजप नाराज

सातारा जिल्हा बँकेवरील वर्चस्वाच्या लढाईत शिंदेसेना आणि राष्ट्रवादीनं भाजपला दूर ठेवत सत्ता मिळवली. सातारा बँकेवरील वर्चस्वासाठी झालेल्या कुरघोडीच्या राजकारणावरून महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सातारा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप नाराज असल्याचे दिसते. एवढेच नव्हे तर सातारा बँकेवरील कुरघोडीच्या राजकारणावरून जिल्ह्यातील भाजपचे मंत्री आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.

पक्षांतर्गत कुरघोड्यांचा फटका बसल्याचे सांगत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पराभवाचे खापर अप्रत्यक्षपणे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर फोडले आहे. खरंतर महायुतीतला सत्ता संघर्ष काही सातारा जिल्हा बँकेपुरताच मर्यादित नाही. भंडाऱ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत महायुतीतील मित्रपक्षांनीच भाजपविरोधात मोठा डाव टाकला आहे. शिंदेसेना आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसशी हातमिळवणी करत सभापतीपदावर कब्जा केला आहे. भाजपनं अडीच वर्ष सभापतीपदाचे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप शिंदेसेनेने केला आहे.

सातारा, भंडारा, जळगावमध्ये सत्तासंघर्ष

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा बँक निवडणुकीनिमित्ताने भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा मुलगा सुमित पाटील यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद, नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप आणि उमेदवारीवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची चिन्हे आहेत. महायुतीतील वादाची शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे कबुलीच दिली आहे. तर दुसरीकडे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीत सगळे काही आलबेल असल्याचा दावा केला आहे.

समन्वय समिती असूनही फाटाफूट

मुळात महायुतीत स्थानिक पातळीवरही समन्वय राहावा म्हणून समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळी सोडा, झेडपी आणि जिल्हा बँकांमध्येही महायुतीत फाटाफूट झाल्याचे समोर आले आहे. केवळ आमदारच नव्हे तर मंत्र्यांमध्येही बेबनाव असल्याचे उघड झाले आहे. हे कमी होते की काय, भाजपने पालघरमध्ये शिंदेसेनेलाच खिंडार पाडले. त्यामुळे पुढच्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होणार की दोन्ही पक्षांचे नेतृत्व यावर तोडगा काढणार, याची उत्सुकता लागली आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance