विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे पुणे आता मोकळा श्वास घेणार असल्याचे दिसते. कारण पुण्यात अतिक्रमणविरोधात जोरदार धडक कारवाई सुरू आहे. शनिवार वाडा आणि लक्ष्मीरोड परिसरात महापालिकेने तोडक कारवाई केली आहे. या कारवाईवरून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही दबावाला बळी पडू नका, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. इतकेच नाही तर अतिक्रमणविरोधी कारवाई थांबवण्यासाठी जो फोन करणार, त्याचे नाव फलकावर जाहीर करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिल्याचे समजते.
महापालिकेच्या सभेत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आक्रमक होत नगरसेवकांनी आयुक्तांवर टीका केली होती. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवकांनी आंदोलन केल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले. शहरातील विविध भागांत डिसेंबर महिन्यापर्यंत अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू राहणार आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदा अशी मोठी कारवाई होत असून कोणाचाही दबाव नसल्याचे महापौरांनी सांगितले.
दबावाला बळी पडू नका, अधिकाऱ्यांना सूचना
या कारवाईमुळे काही नगरसेवक धास्तावले आहेत. कारण काही कार्यकर्त्यांच्या दुकानांवरही कारवाई झाली आहे. त्यामुळे ही कारवाई कशी मागे घेता येईल, यासाठी नगरसेवकांमध्ये खलबते सुरू आहेत. मुळात सर्वच शहरांमध्ये अधिकारी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी सरसावतात. मात्र नेत्यांच्या चिल्ल्या-पिल्ल्यांचीच अतिक्रमणे वाचवण्यासाठी फोनाफोनी करून दबाव टाकला जातो.
तोच दबाव झुगारून लावण्यासाठी पुण्याच्या आयुक्तांनी नवा फंडा अवलंबल्यामुळे सर्वांनीच धसका घेतला आहे. त्यामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून ही कारवाई विनाअडथळा सुरू असल्याची चर्चा आहे. आता हाच फंडा इतर शहरांमध्येही राबवायला हवा, अशी चर्चा सुरू आहे.
Leave a Reply