शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

एक क्लिक अन् बँक खातं रिकामं; ‘ClickFix’ स्कॅमपासून असं वाचा

बनावट 'मी रोबोट नाही' पेज दाखवून वापरकर्त्यांकडून कमांड चालवून घेणारा 'ClickFix' स्कॅम पसरतोय. एका चुकीच्या क्लिकने बँक खात्याची माहिती चोरीला जाऊ शकते.

एक क्लिक अन् बँक खातं रिकामं; ‘ClickFix’ स्कॅमपासून असं वाचा

इंटरनेटवर एखादी वेबसाईट उघडली की आपण अनेकदा पडताळणीसाठी असलेला कॅप्चा, ‘मी रोबोट नाही’ किंवा ‘तुम्ही माणूस आहात हे सिद्ध करा’ असा पर्याय निवडतो. ही सवय आता सायबर गुन्हेगारांच्या फायद्याची ठरत आहे. ‘क्लिकफिक्स’ नावाच्या नव्या सायबर फसवणुकीत बनावट पडताळणी पेज दाखवून वापरकर्त्यांकडूनच धोकादायक क्लिक करून घेतले जाते. त्यामुळे लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये मालवेअर घुसू शकते आणि वैयक्तिक माहिती तसेच डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते.

## स्कॅम नेमका कसा होतो?

या फसवणुकीत एखादी वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रिनवर कॅप्चा किंवा ‘मी रोबोट नाही’ असा संदेश दिसतो. तो अगदी खऱ्या पडताळणी पेजसारखा दिसतो. आपण त्यावर क्लिक करतो आणि त्यानंतर काही विचित्र सूचना दिल्या जातात. उदाहरणार्थ, कीबोर्डवरील विंडोज आणि आर ही बटणं दाबा, त्यानंतर कंट्रोल आणि व्ही दाबा आणि एंटर दाबा, असं सांगितलं जातं. या प्रक्रियेत वेबसाईटने आधीच कॉपी केलेली धोकादायक कमांड फोन किंवा लॅपटॉपच्या रन विंडोमध्ये पेस्ट होते. त्यानंतर हॅकर्सच्या नियंत्रणाखालील सर्व्हरवरून मालवेअर डाऊनलोड होऊन फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल होण्याची शक्यता असते. या मालवेअरच्या मदतीने बँकिंगसह सगळ्या खात्यांचे पासवर्ड आणि इतर डेटा चोरला जातो. काही प्रकारांमध्ये रॅन्समवेअर किंवा संगणकावर प्रोग्रामही पाठवले जाऊ शकतात.

## या स्कॅमपासून कसं वाचाल?

कोणतीही वेबसाईट कॅप्चा पूर्ण करण्यासाठी विंडोज आणि आर, पॉवरशेल किंवा टर्मिनल उघडण्यास सांगत असेल, तर सावध व्हा. अनोळखी वेबसाईटने दिलेली कमांड कॉपी करून फोनवर किंवा संगणकात पेस्ट करू नका. संशयास्पद पडताळणी पेज दिसल्यास त्यावर दिलेल्या सूचना न पाळता वेबसाईट बंद करा. संगणकातील सुरक्षा प्रणाली आणि ब्राउझर नियमितपणे अपडेट ठेवा. ई-मेल, बँकिंग आणि इतर महत्त्वाच्या खात्यांसाठी मजबूत पासवर्ड आणि सुरक्षा राखा.

चुकून अशा पेजवरील सूचना पाळून कमांड चालवली असेल, तर इंटरनेट कनेक्शन बंद करा आणि विश्वासार्ह सुरक्षा प्रणालीच्या मदतीने संगणकाची तपासणी करा. महत्त्वाचे पासवर्ड सुरक्षित असलेल्या दुसऱ्या उपकरणावरून बदला. बँकेशी संबंधित माहिती धोक्यात आल्याची शंका असल्यास तातडीने बँकेला कळवा.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance