लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. इलिनॉय राज्यातील शिकागो विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला. जागतिक संबंध, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची भूमिका आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी आपली मते मांडली.
पाकिस्तानी विद्यार्थ्याचा प्रश्न आणि राहुल गांधींचे उत्तर
या संवादादरम्यान एका पाकिस्तानी विद्यार्थ्याने त्यांना विचारले की, भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर आरोप करण्याऐवजी परस्परांच्या हितासाठी एकत्र येऊन काम करू शकतात का? यावर राहुल गांधी म्हणाले की, चर्चेची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पाकिस्तान आपल्या देशाविरुद्ध दहशतवादाचे समर्थन आणि प्रोत्साहन देतो, हीच खरी अडचण आहे. आपले निरपराध नागरिक मारले जात असताना त्याच वेळी पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवणे शक्य नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. हे सर्व थांबले की चर्चा सुरू होऊ शकते, असेही ते म्हणाले.
जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका
याच कार्यक्रमात राहुल गांधी यांनी जागतिक राजकारणात भारताच्या सध्याच्या स्थानावरही भाष्य केले. भारताने जागतिक चर्चेत सक्रिय राहिले पाहिजे, असे सांगताना ते म्हणाले की, सध्या भारत केवळ पाहत बसला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील चर्चेत पाकिस्तान सक्रिय भूमिका बजावत असताना भारत त्यात कुठेच दिसत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्वातंत्र्यापासून भारताची जागतिक राजकारणाची समज खोलवर रुजलेली आहे. देशाचा फायदा कशात आहे, यावरून परराष्ट्र धोरण ठरायला हवे. भारताचा एक आवाज आहे, पण तो आवाज आता दिसत नाही आणि भारत मागे पडत चालला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Leave a Reply