तुळशीच्या लग्नापासून राज्यात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना लुटण्यासाठी डिजिटल लग्नपत्रिकेचा नवा सापळा रचला आहे. व्हॉट्सॲपवर आमंत्रणाच्या नावाखाली येणारी फाईल डाऊनलोड केल्यास मोबाईल हॅक होऊन बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
फसवणुकीचा प्रकार कसा असतो
लग्नाचे आमंत्रण म्हणून व्हॉट्सॲपवर .APK स्वरूपाची फाईल पाठवली जाते. ही फाईल उघडल्यास मोबाईलमध्ये हानिकारक सॉफ्टवेअर शिरू शकते आणि त्याद्वारे बँक खात्याची माहिती चोरीला जाऊ शकते. लग्नसराईच्या काळात अशा आमंत्रणपत्रिका मोठ्या प्रमाणावर पाठवल्या जात असल्याने अनेक जण सहजपणे या सापळ्यात अडकण्याची शक्यता असते.
सायबर पोलिसांचे आवाहन
सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. व्हॉट्सॲपवर आलेले आमंत्रण खरे आहे की नाही, याची खात्री केल्याशिवाय कोणतीही फाईल डाऊनलोड करू नये. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशातील फाईल उघडण्यापूर्वी पाठवणाऱ्याशी संपर्क साधून खात्री करून घेणे हा सुरक्षित पर्याय ठरू शकतो.
Leave a Reply