गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरुन सपकाळांचा शिंदे गटावर हल्ला

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याच्या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदे गटावर टीका केली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरले आहे.

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरुन सपकाळांचा शिंदे गटावर हल्ला

शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने वातावरण तापले आहे. शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. शायना एनसी यांनी माफी मागितल्यानंतरही ठाकरे गटाने आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. आता या वादात काँग्रेसने उडी घेतली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदे गट आणि शायना एनसी यांच्यावर टीका केली आहे.

सपकाळ यांची टीका

शायना एनसी यांच्यावर टीका करताना सपकाळ म्हणाले की, लाथ मारायची आणि पाया पडायची असा हा प्रकार आहे. गद्दार सेनेकडून आपण दुसरी काय अपेक्षा करणार, असा सवाल त्यांनी केला. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राबाबत शायना एनसी यांनी केलेल्या आगपाखडीवरही त्यांनी भाष्य केले. एकीकडे विकृती तर दुसरीकडे गद्दारी, ही या पक्षाच्या रोमारोमात भिनलेली आहे, असा प्रत्यय महाराष्ट्राला आल्याचे सपकाळ म्हणाले.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकात विरोध करण्यासारखे काय आहे, तुमचा विरोध का आहे, असा सवाल सपकाळ यांनी केला. त्यात काही चुकीच्या घटना आहेत का, आक्षेपार्ह काय लिहिले आहे, असे त्यांनी विचारले. सावरकरांनी माफीनामे मागितले, हे सर्वत्र माहिती आहे. सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घेत होते, असेही ते म्हणाले.

मायक्रो फायनान्स आणि शेतकऱ्यांचे प्रश्न

मायक्रो फायनान्सवर बोलताना सपकाळ म्हणाले की, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि सावकार शेतकऱ्यांना वेठीस धरत असतील, तर सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. सरकार नावाचा विषय अस्तित्वात राहिला नाही, कायदा कायद्याचे काम करत नाही, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्राचा गृह विभाग पांडू हवलदार की घाशीराम कोतवाल चालवतो, एवढेच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना सपकाळ म्हणाले की, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, असे उपहासाने म्हटले जाते. मात्र, उदार होऊन भोपळाही हाती दिला नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देऊन थट्टा चालवली असून शेतकऱ्यांना अद्याप सानुग्रह अनुदान मिळालेले नाही, असा आरोप त्यांनी केला. अमित शाह दोन दिवस पुण्याला आले, मात्र त्यांनी मित्र पक्षासोबत केवळ फुगड्या खेळण्याचे काम केले. हात हलवत आले आणि हात हलवत गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे, असे सपकाळ म्हणाले. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आम्ही रान उठवू. जर सरकारने मदत दिली नाही, तर मंत्र्यांना आणि सत्ताधारी आमदारांना फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकार केवळ भ्रष्टाचारांमध्ये मग्न असून झाडखाऊ मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटल्याची टीकाही त्यांनी केली.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance