आज १९ नोव्हेंबर, म्हणजेच आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. जगभरात हा दिवस पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पुरुषांसमोरील सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी साजरा केला जातो. पुरुष म्हटले की कुटुंबाची जबाबदारी, करिअर, आर्थिक नियोजन आणि नात्यांमधील अपेक्षा या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मात्र पुरुषांच्या मनातही अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी अनेकजण गुगलची मदत घेतात. फिट कसे राहायचे, केसगळती कशी थांबवायची, वजन कसे कमी करायचे, पगाराचे नियोजन कसे करायचे आणि लग्नासाठी योग्य जोडीदार कसा निवडायचा, अशा अनेक विषयांचा पुरुष इंटरनेटवर शोध घेतात.
फिटनेस, केस आणि त्वचेची काळजी
पुरुषांच्या शोधांमध्ये फिटनेस आणि शरीरयष्टीशी संबंधित विषयांना विशेष महत्त्व आहे. सिक्स पॅक अॅब्स कसे बनवायचे, पोटाची चरबी कशी कमी करायची, स्नायू वाढवण्यासाठी काय खावे, प्रोटीन किती घ्यावे आणि घरच्या घरी व्यायाम कसा करावा, असे प्रश्न अनेकजण शोधतात. जिममध्ये न जाता फिट कसे राहता येईल, याबाबतही पुरुषांना उत्सुकता असते. केसगळती, टक्कल पडणे, केसांची वाढ, दाढी लवकर कशी वाढवावी आणि पांढरे केस काळे कसे करावेत, यांसारखे प्रश्नही पुरुषांच्या आवडीचे आहेत. गुगलच्या जुन्या शोध आकडेवारीनुसार पुरुषांच्या ग्रूमिंगविषयक शोधांमध्ये ५० टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. आता केवळ महिलाच नाही, तर पुरुषही आपल्या त्वचेची काळजी घेण्याबाबत जागरूक झाले आहेत. सनस्क्रीन, फेसवॉश, मॉइश्चरायझर, सीरम, डार्क सर्कल्स कमी करण्याचे उपाय आणि पिंपल्सपासून सुटका कशी मिळवायची, याचा शोध घेतला जातो.
पैसा, करिअर आणि नातेसंबंध
आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी पुरुष इंटरनेटवर वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतात. महिन्याला ५० हजार रुपये कसे कमवायचे, घरबसल्या पैसे कसे कमवायचे, शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी, म्युच्युअल फंड म्हणजे काय, सरकारी नोकरी कशी मिळवावी आणि परदेशात नोकरीच्या संधी कोणत्या आहेत, असे प्रश्नही शोधले जातात. नातेसंबंधांशी संबंधित प्रश्नांचाही पुरुषांच्या शोधांमध्ये समावेश होतो. मुलींना कसे इम्प्रेस करावे, पहिल्या भेटीत काय बोलावे, लग्नासाठी योग्य जोडीदार कसा निवडावा, ब्रेकअपनंतर स्वतःला कसे सावरावे आणि सुखी वैवाहिक आयुष्याचे रहस्य काय, अशा विषयांबाबत अनेकांना जाणून घ्यायचे असते. मानसिक तणाव, झोप न येणे, थकवा, हार्मोन्समधील बदल आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित प्रश्नांचाही शोध घेतला जातो. मात्र अशा समस्यांवर केवळ इंटरनेटवरील माहितीवर अवलंबून न राहता तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Leave a Reply