काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नव्या पुस्तकाने विक्रीचे सर्व विक्रम मोडले आहेत. ‘बिलॉन्गिंग: ए जर्नी ऑफ लव’ या पुस्तकाच्या एका आठवड्यात दोन लाखांहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. प्रकाशक हार्पर कॉलिन्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत पद्मनाभन यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे पुस्तक सर्वांत वेगाने विकले जाणारे पुस्तक ठरले आहे. आत्मचरित्र आणि नॉन-फिक्शन प्रकारातही त्याची विक्री सर्वांत वेगाने होत आहे.
पहिल्या दहा मिनिटांत १५ हजार प्रती
विक्री सुरू होताच पहिल्या दहा मिनिटांतच या पुस्तकाच्या १५ हजारांहून अधिक प्रती वाचकांपर्यंत पोहोचल्या. ही सुरुवातच पुस्तकाच्या विक्रमी वाटचालीचे संकेत देणारी ठरली. हे पुस्तक एकूण ५४४ पानांचे आहे. त्याची छापील किंमत १,२९९ रुपये आहे. काही ऑनलाईन मंचांवर ते सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. छापील किमतीच्या आधारे हिशेब केल्यास, दोन लाख प्रतींच्या विक्रीतून गेल्या सात दिवसांत सुमारे २५.९८ कोटी रुपये, म्हणजेच जवळपास २६ कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.
रॉयल्टी किती मिळणार?
या पुस्तकातून सोनिया गांधी यांना किती रॉयल्टी मिळेल, याबद्दलही अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. देशात हार्डकव्हर पुस्तकांसाठी लेखकांना साधारणपणे १० ते १२.५ टक्के रॉयल्टी मिळते. काही लेखकांना प्रकाशक १५ टक्क्यांपर्यंत रॉयल्टी देतात. सोनिया गांधी आणि प्रकाशक यांच्यातील करार गोपनीय असल्याने याबाबतचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. मात्र ठोकताळ्याच्या हिशेबानुसार, १० टक्के रॉयल्टी मिळाल्यास २.६० कोटी रुपये, १२.५ टक्के रॉयल्टी मिळाल्यास ३.२५ कोटी रुपये, तर १५ टक्के रॉयल्टी मिळाल्यास ३.९० कोटी रुपये मिळू शकतात. हा केवळ अंदाज आहे.
पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा
सोनिया गांधी यांनी हे पुस्तक का लिहिले, याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यांचे मित्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पुस्तक लिहिण्याचा आग्रह धरत होते. सुरुवातीला आपल्या आयुष्यातील अनुभव मांडण्यास त्यांना संकोच वाटत होता. मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही त्यांना आग्रह केला. त्यानंतर त्यांनी पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. गांधी कुटुंब, पती आणि मुलांबद्दल समाजात अनेक चुकीच्या गोष्टी आणि अफवा पसरवल्या जातात. त्या सर्वांना उत्तर देण्यासाठी आणि कुटुंबाची खरी बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचे त्यांनी प्रकाशन सोहळ्यात सांगितले.
Leave a Reply