मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणावरून राजकीय वाद पेटला आहे. राज्य सरकारने या स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. त्यांची यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ नोव्हेंबर रोजी या नामकरणासाठी आगामी विधिमंडळ अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा वाद अधिकच तापला. प्रभाग क्रमांक १९२ चे नगरसेवक असलेले किल्लेदार यांनी दादरचे नाव बदलताना स्थानिक दादरकरांचे मत विचारात घेतले गेले नसल्याचा आरोप केला आहे.
बाहेरच्यांची मागणी थोपवू नका
यशवंत किल्लेदार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट लिहून आपली आक्रमक भूमिका मांडली. दादरचे नाव बदलताना स्थानिकांना विश्वासात घेतले गेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. बाहेरच्या लोकांनी केलेल्या मागणीला दादरकरांवर थोपवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वी जेव्हा हा विषय पुढे आला होता, तेव्हा स्थानिकांनी त्याला विरोध केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.
दादरकरांची ओळख पुसण्याचे काम सुरू असल्याचे सांगत त्यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध केला. सरकारने मनमानी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिणार
रेल्वे स्थानकाच्या नामकरणाचा विषय महानगरपालिकेच्या अख्त्यारित येत नाही, तर तो केंद्र सरकारच्या अख्त्यारितील रेल्वे खात्याकडे येतो, असे किल्लेदार यांनी स्पष्ट केले. नागरिकांना काय मान्य आहे आणि काय नाही, यावरच सरकारे चालतात, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णयाबाबत दादरकरांची चाचपणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. दादरकरांच्या भावना पत्राद्वारे पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.
दादर रेल्वे स्थानकाची सुरुवात १८५३ मध्ये झाली होती. अगोदर याला माहिम रोड असे नाव असल्याचे सांगितले जाते. मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारे हे मुंबईतील सर्वात महत्त्वाचे स्थानक आहे. ब्रिटिश काळात मुंबईच्या विस्ताराला आणि प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामोरे जाण्यासाठी हे स्थानक विकसित करण्यात आले होते. आज दादर येथे १४ फलाट आहेत आणि ते मुंबई उपनगरीय वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे.
Leave a Reply