वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांनी दमदार सुरुवात केली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताला पहिल्याच षटकात यश मिळालं. जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला शून्यावर क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर पुनरागमन करणाऱ्या युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजने दुसरा सलामीवीर डेव्हन कॉनवेला यष्टीरक्षक ऋषभ पंतकरवी केवळ ४ धावांवर झेलबाद केलं.
रिव्ह्यू न घेतल्याने हुकली विकेट
सुरुवातीच्या दोन धक्क्यांनंतर भारतीय संघाला न्यूझीलंडला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलून तिसरी विकेट घेण्याची सुवर्णसंधी मिळाली होती, परंतु डीआरएसचा एक चुकीचा निर्णय त्यांना महागात पडला. ११ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अंशुल कंबोजने ऑफ-स्टंपच्या बाहेर चांगल्या लांबीचा चेंडू टाकला, जो रचिन रवींद्रच्या बॅटची बाहेरील कड घेऊन यष्टीमागे गेला. भारतीय खेळाडूंनी झेलसाठी जोरदार अपील केलं आणि स्टंप माइकवर ऋषभ पंतचा आवाज ऐकू आला की, हा बाद आहे. पंचांनी त्याला नाबाद घोषित केल्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि संघाने रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय महागात पडला, कारण नंतर अल्ट्राएज रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसलं की चेंडू रचिन रवींद्रच्या बॅटची बाहेरील कड घेऊन गेला होता. जर भारतीय संघाने त्यावेळी रिव्ह्यू घेतला असता, तर रचिन रवींद्र बाद झाला असता आणि भारताला तिसरं मोठं यश मिळालं असतं.
रवींद्रला फार काळ फायदा घेता आला नाही
मात्र रचिन रवींद्रला मिळालेल्या या संधीचा फार काळ फायदा घेता आला नाही, कारण वेगवान गोलंदाज आकाश दीपने त्याला यष्टीमागे ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं आणि भारताला तिसरं यश मिळवून दिलं. रवींद्रने ५० चेंडूंमध्ये दोन चौकारांच्या मदतीने १५ धावा केल्या. जर गिलने पंतचं तेव्हाच ऐकलं असतं, तर त्याला इतक्या धावा करण्यातही यश मिळालं नसतं.
Leave a Reply