चित्रपटसृष्टीत नाव कमवायला अनेक वर्षांची मेहनत लागते, पण एकच चुकीचा निर्णय संपूर्ण कारकीर्द थांबवू शकतो. अभिनेत्री कोएना मित्राच्या बाबतीत नेमकं तसंच घडलं. एका गाण्याने रातोरात प्रसिद्धी मिळवलेली ही अभिनेत्री नाकाच्या शस्त्रक्रियेनंतर अडचणीत सापडली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं.
‘साकी साकी’ने मिळवून दिली ओळख
कोएनाचा जन्म कोलकाता येथे झाला. मानसशास्त्र विषयात तिने पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. २००२ मध्ये ग्लॅडरॅग्स सुपरमॉडेल स्पर्धा जिंकल्यानंतर तिने मनोरंजनविश्वात पाऊल ठेवलं. ‘रोड’ चित्रपटातील ‘खुल्लम खुल्ला’ या गाण्यातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुसाफिर’ चित्रपटातील ‘साकी साकी’ या गाण्याने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. या गाण्यात संजय दत्तसोबत तिची जोडी दिसली होती. त्यानंतर ‘एक खिलाडी एक हसीना’, ‘अपना सपना मनी मनी’ आणि ‘इन्सान’ यांसारख्या चित्रपटांतही तिने काम केलं.
शस्त्रक्रियेनंतर आलेलं वादळ
२००६-२००७ च्या दरम्यान कोएनाने नाकाची शस्त्रक्रिया केली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर तिच्या चेहऱ्याच्या हाडांना सूज येऊ लागली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की डॉक्टरांनाही तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल याबाबत खात्री देता येत नव्हती. २०१३ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत कोएनाने सांगितलं होतं की, शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी औषधं आणि प्रार्थनांशिवाय दुसरा पर्याय नसल्याचं सांगितलं होतं. सुरुवातीला सहा महिने घरात राहण्याचा सल्ला तिला देण्यात आला होता. मात्र सतत घरात राहणं शक्य नसल्याने तिने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिच्या बदललेल्या चेहऱ्यामुळे लोकांनी वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या. कोएनाने सांगितलं की, तिने शस्त्रक्रियेची गोष्ट कधीही लपवली नाही. तरीही लोकांनी तिच्या दिसण्यावरून अत्यंत वाईट प्रतिक्रिया दिल्या. काही जवळच्या मित्रांनीही तिची साथ सोडली.
तीन वर्षांचा मानसिक त्रास
२०२१ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत कोएनाने सांगितलं होतं की, ही शस्त्रक्रिया कोणती मोठी इम्प्लांट शस्त्रक्रिया नव्हती, तर एक साधी दुरुस्तीची प्रक्रिया होती. मात्र तिच्या शरीराने त्यावर वेगळी प्रतिक्रिया दिली. २०२२ मध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने या अनुभवाला तीन वर्षांचा त्रासदायक काळ असं म्हटलं होतं. शस्त्रक्रियेनंतर सलग तीन वर्षे तिला नकारात्मक प्रसिद्धीचा सामना करावा लागला. लोकांकडून मिळणाऱ्या टीकेमुळे तिच्या कारकिर्दीवरही परिणाम झाला.
चित्रपटसृष्टीतील संधी कमी झाल्यानंतर कोएना २०११ मध्ये लॉस एंजेलिसला गेली. तिथे तिने काही चित्रपटांसाठी ऑडिशन्स दिल्या. मात्र तिचे अनेक प्रोजेक्ट प्रत्यक्षात पूर्णत्वास गेले नाहीत. २०१९ मध्ये ‘बिग बॉस १३’ या रिअॅलिटी शोमधून ती पुन्हा चर्चेत आली. मात्र या शोमधील तिचा प्रवास फार काळ टिकला नाही.
Leave a Reply