न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. पहिल्याच सत्रात भारताने न्यूझीलंडचे चार फलंदाज माघारी धाडले. दुपारच्या जेवणापर्यंत न्यूझीलंडने २३ षटकांत ४ बाद ६० धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताने चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली. ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत या दोघांचाही यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला. मोहम्मद सिराज, गुरनूर ब्रार आणि रवींद्र जडेजा यांना संघाबाहेर ठेवण्यात आले; त्यांच्या जागी आकाश दीप आणि अंशुल कंबोज यांना संधी मिळाली. वॉशिंग्टन सुंदर फिरकी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात आहे.
बुमराह आणि कंबोजची सुरुवात
न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात कर्णधार टॉम लॅथमला माघारी धाडले. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर लॅथम बाद झाला; त्याला खातेही उघडता आले नाही. त्याने फक्त दोन चेंडूंचा सामना केला. त्यानंतर चौथ्या षटकात अंशुल कंबोजने भारताला दुसरे यश मिळवून दिले. डेव्हन कॉनवे ऋषभ पंतकरवी झेलबाद झाला; त्याला १३ चेंडूंत केवळ चार धावा करता आल्या.
निकोल्स-रचिनची भागीदारी मोडली
१२ धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर हेन्री निकोल्स आणि रचिन रवींद्र यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ९५ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केली. मात्र आकाश दीपने ही भागीदारी मोडली. डावाच्या २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रचिन पंतकरवी झेलबाद झाला; त्याने ५० चेंडूंत १५ धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला ५१ धावांवर तिसरा धक्का बसला. याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बुमराहने डॅरिल मिचेलला बाद केले. मिचेलला आठ चेंडूंत एकच धाव करता आली; तो यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ५२ धावांवर ४ बाद अशी झाली. यानंतर निकोल्स आणि टॉम ब्लंडेल यांनी सावध फलंदाजी करत दुपारच्या जेवणापर्यंत आणखी विकेट पडू दिली नाही. दुपारच्या जेवणापर्यंत बुमराहने २, आकाश दीपने १ आणि कंबोजने १ विकेट मिळवली. प्रसिद्ध कृष्णाला मात्र अद्याप विकेट मिळालेली नाही.
Leave a Reply