गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

ठाणे आपत्ती दलाच्या जवानांना आता एक कोटींचे विमा कवच

ठाणे आपत्ती दलाच्या जवानांचे विमा संरक्षण २५ लाखांवरून एक कोटी करण्याचा प्रस्ताव आहे. आयुक्तांनी मान्यता दिली असून, अंतिम मंजुरीसाठी तो महासभेपुढे आहे.

ठाणे आपत्ती दलाच्या जवानांना आता एक कोटींचे विमा कवच

आपत्कालीन वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना आता एक कोटी रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळणार आहे. सध्या असलेल्या २५ लाख रुपयांच्या विमा संरक्षणात तब्बल चार पट वाढ करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.

आयुक्तांनी या प्रस्तावाला मान्यता दिली असून, अंतिम मंजुरीसाठी तो महासभेपुढे ठेवण्यात आला आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यास आपत्तीच्या काळात नागरिकांसाठी जीव धोक्यात घालणाऱ्या जवानांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना एक कोटींचे विमा कवच मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

२८ जवानांचे दल

महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या धर्तीवर ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण पूर्ण केलेले २८ जवान या दलात कार्यरत आहेत. शहरात पूरस्थिती निर्माण होणे, इमारती कोसळणे, आगीच्या दुर्घटना किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास हे जवान तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बचाव आणि मदतकार्य करतात. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचविण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते.

अधिकाऱ्यांनाही विम्याचे संरक्षण

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रमुख म्हणून काम पाहतात. आपत्कालीन घटनांच्या वेळी त्यांनाही घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचे नियोजन आणि नियंत्रण करावे लागते. त्यामुळे जवानांप्रमाणेच त्यांनाही जीविताचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संवर्गाचाही समूह अपघात विमा योजनेत समावेश करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

सध्याच्या विमा योजनेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत असल्याने तिचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे. वाढीव विमा संरक्षणासह नूतनीकरणासाठी ११ लाख रुपयांचा विमा हप्ता अपेक्षित आहे. हा खर्च महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या लेखाशीर्षातून करण्यात येणार आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance