गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

वसई-विरारमधील नाले प्रदूषित; नागरिकांच्या आरोग्याला धोका

वसई-विरारमधील १४० नाल्यांत गाळ, प्लॅस्टिक व कचरा साचल्याने प्रदूषण वाढले आहे. दुर्गंधी व डासांमुळे आजारांचा धोका असून, भटक्या जनावरांच्याही जीवाला धोका आहे.

वसई-विरारमधील नाले प्रदूषित; नागरिकांच्या आरोग्याला धोका

वसई-विरार शहरात स्वच्छता आणि जलसंवर्धनाचा जागर केला जात असतानाच दुसरीकडे शहरातील नाल्यांची अवस्था मात्र चिंता वाढवणारी ठरली आहे. शहरातील सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या अनेक नाल्यांमध्ये गाळ, प्लॅस्टिक आणि कचरा साचला असून, त्यामुळे हे नाले प्रदूषणाची केंद्रे बनले आहेत.

नाल्यांमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साचलेल्या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्यांच्या काठावर कचऱ्याचे ढीग पडले असून, त्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या, अन्नाचे उरलेले भाग आणि इतर टाकाऊ वस्तू आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह मंदावला आहे आणि काही ठिकाणी दूषित पाणी साचून राहत आहे.

दुर्गंधी आणि डासांमुळे आजारांचा धोका

कचरा आणि साचलेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यातून मलेरिया आणि डेंगी यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. नाल्यांमध्ये आणि त्यांच्या काठावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.

भटक्या जनावरांच्या जीवितालाही धोका

नाल्यांच्या काठावर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये भटकी जनावरे अन्नाच्या शोधात फिरतात. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि घातक वस्तू असतात. अन्नासोबत प्लॅस्टिकही जनावरांच्या पोटात जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासोबतच मुक्या जनावरांच्या जीविताचा प्रश्नही या प्रदूषणामुळे ऐरणीवर आला आहे.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात १४० हून अधिक लहान-मोठे नाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची साफसफाई करून पाण्याचा निचरा सुरळीत राहावा आणि पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जाते. मात्र पावसाळ्यानंतर या नाल्यांच्या देखभालीकडे पुरेसे लक्ष दिले जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाले स्वच्छ राहावेत यासाठी प्रशासनाकडून नियमित खबरदारी घेतली जाते, मात्र ज्या ठिकाणी कचरा साचलेला आहे किंवा नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकला जात आहे, अशा ठिकाणांची पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी सांगितले.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance