न्यूझीलंड विरुद्ध पाच वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये रोहित शर्माने अपेक्षेनुसार प्रदर्शन केलं नाही. एकूण चार डावांत त्याने फक्त 30 धावा केल्या. त्याचा फटका रोहितला वनडे रँकिंगमध्ये बसला आहे. आयसीसीने बुधवारी 18 नोव्हेंबरला ताजी रँकिंग जारी केली आहे. यात शुबमन गिल नंबर 1 वर आहे. विराट कोहलीच्या स्थानात काही बदल झालेला नाही.
टॉप 5 मध्ये एकच बदल
आयसीसी वनडे फलंदाजांच्या रँकिंगमध्ये टॉप 5 मध्ये फक्त एक बदल झाला आहे. रोहित शर्माची चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. रोहितचे 732 रेटिंग पॉइंट्स झाले आहेत. अफगाणिस्तानचा इब्राहिम जादरान पाचव्यावरून चौथ्या नंबरवर पोहोचला आहे. शुबमन गिल 806 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या नंबरवर आहे. शुबमन गिल न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीजच्या तयारीसाठी चौथी आणि पाचवी वनडे खेळला नव्हता. डॅरिल मिचेल 778 रेटिंग पॉइंट्ससह दुसऱ्या आणि विराट कोहली 757 पॉइंट्ससह तिसऱ्या नंबरवर आहे.
वनडे फलंदाजांच्या टॉप 10 रँकिंग लिस्टमधून केएल राहुल बाहेर गेला आहे. तो 10 व्या वरून 11 व्या नंबरवर गेला आहे. जो रूटच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. 11 व्या स्थानावरून तो 9 व्या नंबरवर आला आहे. पाकिस्तानचा बाबर आजम 9 व्या वरून 8 व्या नंबरवर आला आहे. बेन डकेटचं नुकसान झालं आहे. शाइ होपच्या क्रमवारीत एका स्थानाची सुधारणा झाली आहे. श्रीलंकेच्या कुशल मेंडिसच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा होऊन तो 10 व्या नंबरवर आला आहे.
श्रेयस अय्यरला फटका, बॅटनची मोठी झेप
15 नोव्हेंबरला एडिलेडमध्ये इंग्लंडचा फलंदाज टॉम बॅटन ऑस्ट्रेलिया विरुद्ध 121 धावांची शानदार इनिंग खेळला होता. आयसीसीकडून याचं त्याला चांगलं इनाम मिळालं आहे. 34 व्या स्थानावरून तो थेट 13 व्या नंबरवर पोहोचला आहे. विल यंगने सुद्धा तशीच मोठी झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा ओपनर यंग 45 व्या क्रमांकावरून 30 व्या नंबरवर पोहोचला आहे. श्रेयस अय्यरच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. तो 23 व्या स्थानावर पोहोचला आहे.
आयसीसी टॉप 10 वनडे फलंदाजांची रँकिंग अशी आहे: शुबमन गिल (भारत) – 806, डॅरिल मिचेल (न्यूझीलंड) – 778, विराट कोहली (भारत) – 757, इब्राहिम जादरान (अफगाणिस्तान) – 752, रोहित शर्मा (भारत) – 732, शाइ होप (वेस्टइंडीज) – 710, बेन डकेट (इंग्लंड) – 699, बाबर आजम (पाकिस्तान) – 661, जो रूट (इंग्लंड) – 652 आणि कुशल मेंडिस (श्रीलंका) – 649.
Leave a Reply