सोनिया गांधी यांच्या जर्नी ऑफ लव्ह या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात मजकूर असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आज पत्रकार परिषदेत पुस्तकाची प्रत फाडली. या घटनेनंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. इतिहास कोणी कितीही पुसण्याचा प्रयत्न केला, तरी तो पुसला जाणार नाही, असे सपकाळ म्हणाले.
इतिहास पुसता येत नाही
सूर्यावर थुंकले, तर ती थुंकी आपल्याच अंगावर पडते, अशा शब्दांत सपकाळ यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. शिंदे सेनेने राजकारणाचे विकृतीकरण केल्याचा आरोप त्यांनी केला. सोनिया गांधी यांनी आठवणींचा ठेवा देशासोबत सामायिक केला असून पुस्तकाचा खप प्रचंड होत असल्याचे ते म्हणाले. पुस्तक फाडणे म्हणजे सूर्यावर पडदा टाकण्यासारखे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शिंदे शिवसेनेची मानसिक दिवाळखोरी झाली असून त्यांच्याकडे संस्कृती नव्हतीच, असा आरोपही सपकाळ यांनी केला. आधी पुस्तक वाचावे, मग त्यावर चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
फडणवीसांच्या निर्णयांचे जीआर फाडा
शिंदे शिवसेनेमध्ये एवढी हिम्मत असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे शिवसेनेविरोधात घेतलेल्या निर्णयांचे शासन निर्णय फाडून दाखवावेत, असे थेट आव्हान सपकाळ यांनी दिले. महिलांनी पुस्तक फाडल्याच्या प्रश्नावरही ते बोलले. महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. सोनिया गांधी वयाच्या २१ व्या वर्षी सून म्हणून भारतात आल्या. १९९१ मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. सासूचे त्यांच्या मांडीवर प्राण गेले. त्यांनी पंतप्रधानपद नाकारले. अशा त्यागाची आणि बलिदानाची परंपरा असलेल्या महिलेविरोधात अशी कृती अशोभनीय असल्याचे सपकाळ म्हणाले. काँग्रेस प्रत्युत्तर म्हणून तसे वागणार नाही. शिंदे गटाचा भ्रष्ट कारभार समोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Leave a Reply