आपल्या स्वयंपाकात तेलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रोजची भाजी-आमटी असो, सणासुदीचे तळण असो वा स्नॅक्स, तेलाचा वापर अटळ असतो. परंतु अलिकडच्या काळात हृदयविकार आणि चयापचयाच्या आजारांबद्दल जागरूकता वाढल्यामुळे रिफाइंड तेल आरोग्यासाठी घातक आहे का आणि कच्च्या घाण्याचे तेल नेहमीच निरोगी असते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. याशिवाय तळलेले तेल वारंवार गरम करून पुन्हा वापरण्याची सवयही अनेक घरांत आणि हॉटेल्समध्ये आहे.
रिफाइंड विरुद्ध घाण्याचे तेल
या दोन्ही प्रकारच्या तेलांमधील मुख्य फरक ते बियाण्यांमधून काढण्याच्या प्रक्रियेत असतो. कच्च्या घाण्याचे तेल बियाणे, सुकामेवा किंवा फळांना जास्त तापमान किंवा रसायनांचा वापर न करता यांत्रिक पद्धतीने दाबून काढले जाते. कमी प्रक्रियेमुळे या तेलात नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स, स्वाद आणि सूक्ष्म पोषक घटक टिकून राहतात. तर रिफाइंड तेलातील अशुद्धता, दुर्गंधी आणि फ्री फॅटी ॲसिड काढण्यासाठी डिगमिंग, न्यूट्रलायझेशन, ब्लिचिंग आणि डिओडोरायझेशन या रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे तेलाची चव तटस्थ होते आणि ते उच्च तापमानावरील स्वयंपाकासाठी योग्य बनते. मात्र सर्वच रिफाइंड तेल वाईट असते किंवा सर्वच घाण्याचे तेल उत्तम असते असा समज चुकीचा आहे. तेलाचे पोषणमूल्य त्याचा मूळ स्रोत, फॅटी ॲसिडची रचना आणि साठवणुकीवर अवलंबून असते.
तेल वारंवार गरम केल्यावर काय घडते?
तेलाचा पुनर्वापर करणे, विशेषतः जास्त तापमानावर तळण्यासाठी, ही आरोग्यासाठी अत्यंत घातक सवय आहे. तेल दीर्घकाळ उच्च तापमानाला संपर्कात आल्यास त्यात ऑक्सिडेशन, हायड्रोलिसिस आणि पॉलिमरायझेशन या रासायनिक प्रक्रिया होतात. या प्रक्रियेमुळे एल्डिहाइड्स, ऑक्सिडाइज्ड ट्रायग्लिसराइड्स आणि पोलर कंपाऊंड्स यांसारखे हानिकारक घटक तयार होतात, जे शरीरातील अवयवांवर विषारी परिणाम करतात. तेल काळे पडणे, घट्ट होणे, दुर्गंधी येणे आणि खूप फेसाळणे हे तेल खराब झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
अतिप्रमाणात ट्रान्स फॅट्सचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका प्रचंड वाढतो. औद्योगिक ट्रान्स फॅट्स वनस्पती तेलाच्या हायड्रोजनेशन प्रक्रियेतून बनतात. परंतु घरात किंवा हॉटेलमध्ये तेल वारंवार जास्त तापमानावर तापवल्यास त्यात सूक्ष्म प्रमाणात ट्रान्स फॅट्स तयार होतात. केवळ ट्रान्स फॅट्सच नाही, तर तेलाच्या विघटनामुळे तयार होणारे ऑक्सिडाइज्ड घटक आणि एल्डिहाइड्स हे शरीराच्या चयापचय संस्थेला हानी पोहोचवतात.
तेल वापरण्याचे ५ नियम
कोणतेही एक तेल सर्व प्रकारच्या स्वयंपाकासाठी आदर्श असू शकत नाही. तेलाची निवड त्याच्या फॅटी ॲसिड रचनेवर आणि शिजवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असावी. शेंगदाणा, मोहरी, तीळ आणि ऑलिव्ह ऑइल यांसारखी मोनोअन्सॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असलेली तेले रोजच्या फोडणी आणि स्वयंपाकासाठी योग्य असतात. जास्त पॉलीअन्सॅच्युरेटेड फॅट्स असलेली तेले आरोग्यासाठी चांगली असली तरी ती जास्त वेळेसाठी उच्च तापमानावर तापवणे योग्य नसते. जास्त तापमानाची गरज नसलेल्या पदार्थांसाठी घाण्याचे तेल वापरावे, तर डीप फ्राय किंवा उच्च तापमानावरील स्वयंपाकासाठी योग्य रिफाइंड तेलाचा मर्यादित वापर केला जाऊ शकतो.
तेलाचा वापर करताना पाच नियमांचे पालन केल्यास आरोग्याचे गंभीर धोके टाळता येतात. पहिला, तळण्यासाठी एकदा वापरलेले तेल पुन्हा गरम करून वापरू नका; दरवेळी ताजे तेल वापरा. दुसरा, तेल जास्त तापून त्यातून धूर निघेपर्यंत ते गरम करू नका; प्रत्येक तेलाचा स्मोक पॉइंट वेगळा असतो. तिसरा, स्वयंपाकाचे तेल हवाबंद डब्यात, थेट सूर्यप्रकाश, उष्णता आणि ओलाव्यापासून दूर अंधाऱ्या किंवा थंड जागी ठेवा. चौथा, सर्व प्रकारच्या पदार्थांसाठी एकाच प्रकारचे तेल उच्च तापमानावर वापरू नका; पदार्थानुसार तेल निवडा. पाचवा, ताजे तेल वापरले तरीही तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने उष्मांक वाढतात आणि आरोग्याचे संतुलन बिघडते, त्यामुळे तळलेले पदार्थ मर्यादित खा.
रिफाइंड विरुद्ध घाण्याचे या वादात पडण्यापेक्षा तुम्ही तेल कसे वापरता आणि किती प्रमाणात वापरता हे जास्त महत्त्वाचे आहे. दोन्ही प्रकारची तेले योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरल्यास संतुलित आहाराचा भाग बनू शकतात. तेलाचा पुनर्वापर पूर्णपणे थांबवणे, तळलेले पदार्थ मर्यादित ठेवणे आणि आहारात निरोगी फॅट्सचे संतुलन राखणे हाच दीर्घकालीन हृदय आणि चयापचय आरोग्य टिकवून ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
Leave a Reply