भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली आहे. तो आता चेन्नई सुपर किंग्समध्ये मार्गदर्शकाच्या भूमिकेत काम करणार असून, संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. धोनीची फलंदाजी मात्र प्रेक्षकांना नक्कीच आठवणीत राहील.
संकटात सापडलेल्या चेन्नई सुपर किंग्सला धोनीने अनेकदा बाहेर काढत हातचे गेलेले सामने जिंकून दिले आहेत. तब्बल पाच वेळा त्याने चेन्नईला आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले आहे. फलंदाजी, यष्टिरक्षण आणि कर्णधारपद अशा तिन्ही आघाड्यांवर त्याची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.
२७८ सामन्यांत ५ हजारांहून अधिक धावा
धोनी आपल्या आयपीएल कारकिर्दीत २७८ सामने खेळला असून ३८.३० च्या सरासरीने ५ हजार ४३९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २४ अर्धशतके आहेत. याशिवाय त्याने २६४ षटकार आणि ३७५ चौकार लगावले आहेत. आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ८४ आहे. विशेष म्हणजे, इतकी मोठी कारकीर्द असूनही धोनीला आयपीएलमध्ये एकही शतक झळकावता आले नाही.
२००८ मध्ये झालेल्या पहिल्या आयपीएल लिलावात चेन्नई सुपर किंग्सने धोनीला १५ लाख डॉलरमध्ये आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर तो चेन्नईच्या संघाचा महत्त्वाचा चेहरा बनला. ७ जुलै १९८१ रोजी रांची येथे जन्मलेल्या धोनीने २००८ पासून चेन्नईसोबतचा प्रवास सुरू केला.
पाच वेळा विजेतेपद, यष्टिरक्षणातही विक्रम
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ अशी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली. २०१० आणि २०११ मध्ये सलग दोन हंगाम विजेतेपद मिळवून देत आयपीएल विजेतेपदाचा यशस्वी बचाव करणारा तो पहिला कर्णधार ठरला. धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक २३५ सामन्यांत कर्णधारपद भूषवले. यापैकी १३६ सामन्यांत त्याच्या संघाने विजय मिळवला. त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने तब्बल १० वेळा अंतिम फेरी गाठली.
यष्टिरक्षक म्हणूनही त्याने मोठी कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये त्याने १५८ झेल आणि ४७ यष्टिचित अशा एकूण २०५ खेळाडूंना बाद करण्यात योगदान दिले आहे. यष्टिरक्षक म्हणून आयपीएलमधील हा सर्वाधिक आकडा आहे. कर्णधार म्हणून त्याने २१८ षटकार लगावण्याचा विक्रमही नोंदवला आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत वेगवेगळ्या पाच स्थानांवर खेळताना त्याने अर्धशतके झळकावली आहेत.
धोनीने आयपीएलमधील पाच विजेतेपदांसह चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेचे विजेतेपदही मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या नावावर एकूण सात मोठ्या टी-२० ट्रॉफी जमा झाल्या आहेत. आयपीएल विजेतेपदांच्या बाबतीत तो रोहित शर्माच्या बरोबरीत आहे. दोन वर्षांच्या निलंबनानंतर २०१८ मध्ये संघाने पुनरागमन करत विजेतेपद पटकावले, तेव्हाही धोनीचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले. शांत स्वभाव, सामन्याच्या अखेरच्या क्षणी विजय मिळवून देण्याची क्षमता आणि नेतृत्वगुण यामुळे धोनी चेन्नई सुपर किंग्सची ओळख बनला आहे.
Leave a Reply