कॅथलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप लिओ चौदावे यांनी क्षमा आणि सहिष्णुतेचा एक वेगळा संदेश दिला आहे. पेरूच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रार्थनेसाठी जात असताना गर्दीतून त्यांच्याकडे फेकलेली जपमाळ थेट त्यांच्या डोळ्याजवळ लागली. वेदना जाणवूनही त्यांनी प्रवास थांबवला नाही आणि नियोजित प्रार्थनेत सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीला माफ केल्याचे सांगितले. त्यांची ही प्रतिक्रिया जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे.
लिमामध्ये सुमारे १५ लाखांची गर्दी
पेरूची राजधानी लिमा येथील लास पाल्मास हवाई तळावर पोप अंतिम प्रार्थनेसाठी जात होते. त्यांच्या स्वागतासाठी सुमारे १५ लाख लोक जमल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. पोप मोबाईलमधून प्रवास करत असताना गर्दीतील एका व्यक्तीने त्यांच्याकडे जपमाळ फेकली. ती पकडण्यात पोप यांना यश आले नाही आणि ती थेट त्यांच्या डोळ्याजवळ जोरात लागली. घटनेनंतर त्यांनी चेहऱ्याला हात लावत वेदना जाणवल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र त्यांनी आपला प्रवास थांबवला नाही आणि नियोजित प्रार्थनेतही सहभाग घेतला.
विमानात माफी मागितली, पोप यांनी क्षमा केली
या घटनेनंतर पोप मायदेशी परतत असताना विमानातील पत्रकार परिषदेत एका पेरुव्हियन पत्रकाराने त्यांची माफी मागितली. त्यावर पोप यांनी अत्यंत शांतपणे प्रतिक्रिया दिली. जपमाळ फेकणाऱ्या व्यक्तीचा हेतू आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आणि आपल्याकडून आशीर्वाद मिळवण्याचा असावा, असे त्यांनी सांगितले. पेरूच्या नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आणि खोलवर रुजलेली श्रद्धा असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्या व्यक्तीने मोठ्या श्रद्धेने जपमाळ अर्पण करण्याचा प्रयत्न केला, असे म्हणत त्यांनी या घटनेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले. डोळ्याला लागलेल्या जपमाळेचा उल्लेख करत त्यांनी विनोदी शैलीतही प्रतिक्रिया दिली.
पोप लिओ यांचे पेरूशी जुने आणि जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यांनी आयुष्यात सुमारे दोन दशके पेरूमध्ये घालवली असून त्यांच्याकडे पेरूचे नागरिकत्वही आहे. त्यामुळे या देशातील नागरिकांशी त्यांचे विशेष भावनिक नाते आहे. त्यांच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यात उरुग्वे, अर्जेंटिना आणि पेरू या देशांचा समावेश होता. तब्बल १२ दिवसांच्या या दौऱ्यात त्यांनी अनेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. पोप मोबाईलमधून जाताना भाविकांकडून जपमाळ, खेळणी, झेंडे आणि इतर वस्तू त्यांच्या दिशेने फेकल्या जाण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. मात्र अशा वस्तूंमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांच्या सुरक्षा पथकाचे मत आहे. तरीही या घटनेत पोप यांनी दाखवलेली क्षमाशीलता विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.
Leave a Reply