बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

एनडीएचा ‘रिलायंट रॉबिन’ २९ नोव्हेंबरला घेणार निरोप

एनडीएच्या अज्युटंटचा अश्व रिलायंट रॉबिन सहा वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होत आहे. २९ नोव्हेंबरला होणाऱ्या १३व्या दीक्षांत संचलनात तो अखेरचा सहभागी होणार आहे.

एनडीएचा ‘रिलायंट रॉबिन’ २९ नोव्हेंबरला घेणार निरोप

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या खेत्रपाल परेड मैदानावर लष्करी शिस्त, परंपरा आणि दिमाखाची ओळख बनलेला ‘रिलायंट रॉबिन’ आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. प्रबोधिनीच्या अज्युटंटचा अश्व म्हणून गेली सहा वर्षे जबाबदारी सांभाळणाऱ्या या अश्वाने आतापर्यंत १२ दीक्षांत संचलनांमध्ये सहभाग घेतला आहे. येत्या २९ नोव्हेंबरला होणाऱ्या १३व्या दीक्षांत संचलनात तो अखेरचा सहभागी होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या संचलनानंतर त्याच्या औपचारिक सेवेची सांगता होईल.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत केवळ लष्करी अधिकारी घडविण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही, तर सैन्यदलांच्या समृद्ध परंपरा आणि शिस्तीचा वारसाही जपला जातो. याच परंपरेतील महत्त्वाचा भाग म्हणजे अज्युटंटचा अश्व. दीक्षांत संचलनावेळी प्रबोधिनीचा अज्युटंट अश्वावर स्वार होऊन संचलन मैदानावर प्रवेश करतो. रुबाबदार उपस्थिती आणि शिस्तबद्ध हालचालींमुळे हा अश्व संचलनाचे विशेष आकर्षण ठरतो. त्यामुळे अज्युटंटचा अश्व हा केवळ संचलनाचा भाग नसून, लष्करी शिस्त, नेतृत्व आणि गौरवशाली वारशाचे प्रतीक मानला जातो. गेल्या सहा वर्षांपासून रिलायंट रॉबिनने ही परंपरा दिमाखात पुढे नेली आहे.

बारा संचलनांचा साक्षीदार

जून २०२० मध्ये अज्युटंटचा अश्व म्हणून सेवेत दाखल झालेल्या रिलायंट रॉबिनने आतापर्यंत १२ दीक्षांत संचलनांमध्ये सहभाग घेतला आहे. या काळात प्रबोधिनीमधील अनेक तुकड्यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून प्रवेश केला. या प्रत्येक तुकडीच्या प्रशिक्षण प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्याचा रिलायंट रॉबिन साक्षीदार ठरला आहे. हजारो छात्र, वरिष्ठ लष्करी अधिकारी, मान्यवर आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या संचलनांमध्ये त्याने अज्युटंटला समर्थ साथ दिली.

अज्युटंटच्या अश्वाची निवडही विशेष

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, भारतीय सैन्य अकादमी आणि अधिकारी प्रशिक्षण अकादमी यांसारख्या लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये अज्युटंट या पदाला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण अकादमीतील शिस्त राखण्याची आणि छात्रांपासून अश्वदलापर्यंतच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अज्युटंटवर असते. दीक्षांत संचलनात अज्युटंट अश्वावर स्वार होऊन संपूर्ण संचलनाचे नेतृत्व करतो. त्यामुळे या पदावर नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्याला उत्तम घोडेस्वारीचे कौशल्य असणे आवश्यक असते. निवड प्रक्रियेत अधिकाऱ्याच्या अन्य पात्रतांसोबतच त्याच्या घोडेस्वारीच्या कौशल्याचीही पडताळणी केली जाते.

अज्युटंटसाठी निवडला जाणारा अश्वही विशेष प्रशिक्षणातून तयार केला जातो. लष्करी बँडचे आवाज, हजारो प्रेक्षकांच्या टाळ्या, विमानांचे उड्डाण आणि संचलनादरम्यानच्या विविध हालचाली अशा वातावरणातही घोड्याने शांत आणि शिस्तबद्ध राहणे अपेक्षित असते. त्यासाठी अनेक महिने विशेष प्रशिक्षण दिले जाते. संचलनाच्या अखेरीस निरीक्षणासाठी आलेल्या प्रमुख अधिकाऱ्याला मानवंदना देण्याची जबाबदारीही अज्युटंट आणि त्याच्या अश्वाची असते. साधारणपणे एक अश्व सहा ते सात वर्षे ही जबाबदारी सांभाळतो.

प्रबोधिनीत छात्रांचे प्रशिक्षण, विविध सोहळे आणि अश्वारोहण खेळांसाठी १६० पेक्षा अधिक अश्वांचा स्वतंत्र तबेला आहे. ‘इक्विटेशन ट्रेनिंग टीम’द्वारे दुसऱ्या आणि चौथ्या सत्रातील छात्रांना घोडेस्वारीचे मूलभूत प्रशिक्षण सक्तीने दिले जाते. पोलो, शो जंपिंग, इव्हेंटिंग आणि टेंट पेगिंग अशा अश्वक्रीडा प्रकारांचाही सराव केला जातो. स्नायूंची क्षमता, शारीरिक संतुलन, मानसिक एकाग्रता, धैर्य आणि प्रसंगानुरूप निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे हा प्रशिक्षणाचा उद्देश आहे. प्रबोधिनीच्या प्रमुख सोहळ्यांसाठी १९५३ मधील दोन घोड्यांची ऐतिहासिक बग्गी आजही वापरली जाते.

परेड मैदानावर डौलाने आणि शिस्तीने संचलन करत प्रबोधिनीच्या परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या अज्युटंटच्या अश्वांची परंपरा जुनी आहे. लाईमलाईटने जानेवारी १९५५ ते ऑगस्ट १९७६, पृथ्वीराजने एप्रिल १९६८ ते ऑक्टोबर १९९६, रोमिओने सप्टेंबर १९७८ ते ऑगस्ट २००१, वॉरियरने ऑगस्ट २००१ ते जून २०१९, नक्षने जुलै २००५ ते फेब्रुवारी २०१२, ग्लोबट्रोटरने मार्च २०१२ ते जानेवारी २०२० आणि रिलायंट रॉबिनने जून २०२० ते नोव्हेंबर २०२६ अशी सेवा बजावली आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance