दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला आहे. ‘मफलर मॅन’ म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दाखवत त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकांशी संबंधित राजकीय संबंधांवर प्रश्न उपस्थित केले.
रोहित पवारांनी केलेल्या आरोपानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपसह शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी रोहित पवारांच्या आरोपांना धुडकावून लावत त्यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही यावर प्रतिक्रिया आली आहे.
त्यांच्या या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी १७ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
फडणवीसांवर आरोप करणं चुकीचं!
रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांचा फोटो दाखवून त्यांना दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपांशी उमेश पाटील यांनी असहमती दर्शवली. ‘सार्वजनिक कार्यक्रमात अनेक नेते लोकांना भेटतात, फोटो काढतात. प्रत्येकाची पार्श्वभूमी त्यांना माहिती असतेच असं नाही. केवळ फोटो दाखवून मुख्यमंत्र्यांचा अजितदादांच्या अपघातातील कटकारस्थानाशी संबंध जोडणं बालिशपणाचं आहे,’ असं पाटील म्हणाले.
रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या राजकीय आरोपांचा निषेध करतानाच व्हीएसआर कंपनीसंदर्भातील मुद्दे मात्र गंभीर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
व्हीएसआर कंपनीची कंत्राटं रद्द करा!
व्हीएसआर कंपनीवर मानवी तस्करी, शस्त्रास्त्रांची तस्करी, ड्रग्ज आणि काळ्या पैशाच्या गुंतवणुकीसंदर्भात जे आरोप झाले आहेत, ते सत्य असल्यास अत्यंत गंभीर बाब आहे, असं उमेश पाटील म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या कंपनीची सर्व कंत्राटं तातडीने रद्द करावीत. तसेच कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची संबंधित तपास यंत्रणांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सीआयडी, सीबीआयकडून चौकशीची मागणी
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सर्वसामान्यांच्या मनातील संशय दूर होणं गरजेचं आहे. रोहित पवार यांनी मांडलेली कागदपत्रं आणि मुद्दे सीआयडी, सीबीआय तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे देऊन सखोल चौकशी करावी, असं पाटील यांनी सांगितलं.
कंपनीला देशभरात व्यवसाय करता येणार नाही, यासाठी केंद्र सरकारकडेही बंदीची मागणी करावी, अशी पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
टेंडर प्रक्रियेचीही चौकशी करा!
अजित पवारांनी विमानसेवेसाठी अंतिम केलेल्या टेंडरमधील अटी आणि शर्ती कायम ठेवाव्यात. या टेंडरला विरोध कोणी केला, कोणते प्रशासकीय अधिकारी सहभागी होते आणि केंद्रीय मंत्रालयातील कोणाचा हस्तक्षेप होता, याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, रोहित पवारांचा कल अपघाताच्या तपासापेक्षा प्रसिद्धी मिळवण्याकडे अधिक असल्याची टीकाही उमेश पाटील यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचं स्वागत करत अजितदादांच्या अपघाताचा तपास लवकर पूर्ण करून सत्य महाराष्ट्रासमोर आणावं, अशी मागणी पाटील यांनी केली.
Leave a Reply