नांदेड डिस्ट्रिक्ट आणि सिटी लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित कोहिनूर-एनईएस एमटी २०० जागतिक वर्ल्ड मास्टर्स वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गणेश देवखिळे, संजय चंदवानी, गौरबदीप घोष आणि स्वरणदीप सिंग धोडी यांनी विजेतेपद संपादन केले. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ, अखिल भारतीय टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली होत आहे. एनईएस सायन्स कॉलेज येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत देशभरातील अनुभवी टेनिसपटूंनी सहभाग घेतला आहे.
वेगवेगळ्या वयोगटांतील अंतिम सामने
४० वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत बिगर मानांकित गणेश देवखिळे यांनी दुसऱ्या मानांकित जय नारायण के. आर. यांचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. ५० वर्षांवरील पुरुष गटात अंतिम फेरीत संजय चंदवानी यांनी अव्वल मानांकित जितेंद्र गंभीर यांचा ६-२, ६-० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ३५ वर्षांवरील पुरुष गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित गौरबदीप घोष यांनी शशांक बोमनाळे यांचा ६-१, ६-० असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. ४५ वर्षांवरील पुरुष गटात अंतिम सामन्यात अव्वल मानांकित स्वरणदीप सिंग धोडी यांनी पराग अत्रे यांच्यावर ७-५, ६-१ असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
गौरव राव यांचेही विजेतेपद
३० वर्षांवरील पुरुष एकेरीत गौरव राव यांनी विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित गौरव राव यांनी अव्वल मानांकित मोहित सोरडे यांचा ६-१, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत गौरव यांनी सामन्यावर वर्चस्व राखले. ५५ वर्षांवरील पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत केतन बेडेकर, एलामुरुगु अय्यासामी आणि अशोक इंग्ले यांनी विजय मिळवला, तर ६० वर्षांवरील गटात आलोक रैना आणि संजय कुमार पुढे गेले. ७० वर्षांवरील गटात शिव मोर आणि शाम गायकवाड यांनी उपांत्यपूर्व फेरी जिंकली.
Leave a Reply