महेंद्रसिंग धोनीने समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या एका व्हिडिओने क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भावुक केले आहे. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या माजी कर्णधाराने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील काही खास क्षणांचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला.
या व्हिडिओच्या पार्श्वभूमीला त्याने ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ हेच गाणे ठेवले आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाही धोनीने याच गाण्याचा वापर केला होता. त्यामुळे त्याच्या या पोस्टची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
धोनीच्या कॅप्शननेही वेधले लक्ष
हा व्हिडिओ शेअर करताना धोनीने लिहिलेले कॅप्शनही चर्चेत आले आहे. चाहत्यांच्या प्रेमाचा उल्लेख करत त्याने मजेशीर अंदाजात लिहिले की, चाहत्यांनी त्याला चुकीचे ठरवले. मात्र आपली चूक मान्य करण्यासाठी यापेक्षा चांगले गाणे असूच शकत नाही. कदाचित या गाण्याच्या दोन आवृत्त्या यासाठीच तयार करण्यात आल्या असाव्यात, जेणेकरून तो चूक करू शकेल आणि नंतर ती मान्यही करू शकेल.
धोनीचा हा व्हिडिओ काही वेळातच प्रचंड व्हायरल झाला. चाहत्यांनी टिप्पण्यांमधून त्याच्यावरील प्रेम व्यक्त केले. अनेकांनी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुवर्णयुग म्हटले, तर चेन्नई सुपर किंग्ससाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानले. त्याच्या नेतृत्वाखाली मिळालेले विजय आणि मैदानावरील अविस्मरणीय क्षणांचीही चाहत्यांनी आठवण करून दिली.
व्हिडिओत कोणते खास क्षण?
धोनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्रिकेटमधील अनेक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळतात. युवराज सिंगने एका षटकात मारलेले सहा षटकार, सचिन तेंडुलकरचे ऑस्ट्रेलियातील पहिले एकदिवसीय शतक आणि त्याचे एकदिवसीय द्विशतक अशा खास क्षणांचा यात समावेश आहे.
याशिवाय रोहित शर्माचे द्विशतक, विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पूर्ण केलेल्या १० हजार धावा आणि आयपीएलमधील काही अविस्मरणीय क्षणही धोनीने या व्हिडिओतून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. त्यामुळे धोनीच्या या पोस्टमधून केवळ त्याच्या कारकिर्दीतील आठवणीच नाही, तर क्रिकेटच्या अनेक सुवर्णक्षणांनाही उजाळा मिळाला आहे.
Leave a Reply