सणावारांच्या दिवसांत घरात गोड पदार्थ बनवले जातात, पण नेहमीच गोड खाऊन कंटाळा आला की काहीतरी तिखट आणि चमचमीत खाण्याची इच्छा होते. अशावेळी गरमागरम भाकरी आणि भातासोबत आंध्रप्रदेश स्टाईल स्पेशल टोमॅटो लोणचं हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते आणि दोन ते तीन आठवड्यांपर्यंत व्यवस्थित टिकून राहते.
साहित्य
टोमॅटो, चिंच, गूळ, तेल, मेथी दाणे, जिरं, मोहरी, लसूण पाकळ्या, लाल मिरच्या, हळद, मीठ आणि लाल तिखट.
कृती
सर्वप्रथम टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन कपड्याने कोरडे करा. कढईत तेल गरम करून त्यात टोमॅटोचे तुकडे आणि चिंच घालून वाफवून घ्या. चिंच आणि टोमॅटो एकजीव झाल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा. त्यानंतर तवा गरम करून त्यावर मोहरी, मेथी दाणे आणि जिरे खमंग लालसर होईपर्यंत भाजा आणि थंड झाल्यावर त्यांची बारीक पावडर करा.
तयार पावडरमध्ये टोमॅटो आणि चिंचेचे मिश्रण, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि लसूण पाकळ्या घालून पुन्हा एकदा पेस्ट तयार करा. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, उडीद डाळ, चणाडाळ, लसूण आणि वाळलेल्या लाल मिरच्या घालून खमंग फोडणी तयार करा. त्यात टोमॅटोचे मिश्रण घालून मिसळा आणि टोमॅटोमधील ओलावा कमी झाल्यावर गॅस बंद करून लोणचं थंड होण्यासाठी ठेवा. झटपट तयार झालेले आंध्र स्टाईल टोमॅटो लोणचं भाकरी, भात किंवा कोणत्याही पदार्थासोबत खाता येते.
Leave a Reply