मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बँक निवडणूक; माघारीचा आज अंतिम दिवस

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत आज माघारीचा अंतिम दिवस आहे. आतापर्यंत चार जागा बिनविरोध झाल्या असून, सहा ते सात जागा बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक; माघारीचा आज अंतिम दिवस

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आज माघारीचा अंतिम दिवस असून, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप या निवडणुकीत महायुतीचा जागांचा तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे महाविकास आघाडीला एक जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या संदर्भात रात्री उशिरापर्यंत अजिंठा विश्रामगृहात खलबते सुरू होती.

जिल्हा बँक निवडणुकीत आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाच्या दोन, भाजपची एक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक जागा बिनविरोध झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उभे असलेल्या दोन्ही भाजप उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा, याबद्दलच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी केल्या आहेत. त्यामुळे त्यांचीही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्याचा अर्ज होता. कार्यकर्त्याच्या माघारीनंतर महाजन यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सहा ते सात जागा बिनविरोध होण्याची शक्यता मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचाही अर्ज जिल्हा बँक निवडणुकीत बाद ठरविण्यात आला होता. त्यानंतर सुमित पाटील यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केल्यानंतर त्यांचा अर्ज वैध ठरला आहे. आता सुमित पाटील यांच्या विरोधात असलेला भाजपचा उमेदवार माघार घेऊन सुमित पाटील यांना बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

मुक्ताईनगर आणि चोपड्याचा तिढा कायम

मुक्ताईनगर येथील भाजपच्या मंत्री रक्षा खडसे यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा अर्ज आल्याने तिथे चुरस पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोघांकडून एकमेकांचे अर्ज बाद व्हावेत यासाठी हरकती देखील घेण्यात आल्या. मंत्री रक्षा खडसे यांनी उच्च न्यायालयात शिंदे गटाच्या उमेदवारांच्या उमेदवारीवर आव्हान देत मतदान घेऊ नये अशी याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावल्याने शिंदे गटाच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही जागा लढायचीच असून ती मिळालीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका कालच्या बैठकीत गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यासमोर मांडली. दुसरीकडे चोपडा येथेही भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट आमने-सामने असून, या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

महाविकास आघाडीला एक जागा देण्याचा प्रस्ताव

दोन जागांचा तिढा वगळता जिल्हा बँकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल, असा निर्णय झाला असून निवडणुकीत सर्व जागा महायुतीच जिंकेल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. महायुती झाल्याचा निर्णय झाल्यावर महायुतीतील पक्षांचे एकमेकांविरुद्ध असलेले अर्ज मागे घेतले जातील.

एक जागा द्यावी, त्या बदल्यात इतर सर्व ठिकाणी आमचे उमेदवार माघार घेतील, असा प्रस्ताव महाविकास आघाडी कडून आल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. या संदर्भात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांनी महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा देखील फोन आल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. निवडणुकीसाठी २९ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने राजकारण चांगलंच तापलं आहे.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance