आज १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १४ वा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर, शक्तिस्थळावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सकाळपासूनच राज्यभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शक्तिस्थळावर येत आहेत.
स्मृतिस्थळाकडे जाणाऱ्या मार्गावर भगवे ध्वज लावण्यात आले आहेत, ज्यामुळे परिसर भगवेमय झाला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्मृतिस्थळाची सुंदर सजावट करण्यात आली असून, बाळासाहेबांच्या भाषणातील आणि व्यंगचित्रातील विविध प्रसिद्ध छायाचित्रे येथे लावण्यात आली आहेत. ही छायाचित्रे त्यांच्या स्मृतींना उजाळा देत आहेत.
उद्धव ठाकरे सकाळी ११ वाजता अभिवादन करणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह सकाळी ११ वाजता शक्तिस्थळावर येऊन बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. शिवसैनिकांबरोबरच अनेक राजकीय नेतेही बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
संपूर्ण शिवसेनेच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने स्मृतिदिन कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळपासूनच शिवसैनिक आणि राजकीय नेते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येत असून, दिवसभर शक्तिस्थळावर अभिवादनाचा ओघ सुरू राहणार आहे.
Leave a Reply