पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पाच वर्षांनी सोमवारी दिल्लीत एका विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते सहभागी झाले. या कार्यक्रमात ते पहिल्या रांगेत बसलेले दिसले. सध्या अमरिंदर सिंग हे भारतीय जनता पक्षात आहेत.
पाच वर्षांपूर्वी अमरिंदर सिंग यांनी सात पानी पत्र लिहून काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी सोनिया गांधी आणि त्यांच्या मुलांवर मध्यरात्री पंजाबच्या मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील त्यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
या सोहळ्यात राहुल गांधी यांनी 84 वर्षीय अमरिंदर सिंग यांना पाहिले. त्यावेळी त्यांनी कुटुंबाशी संबंधित एक जुना किस्सा सांगितला. राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी अमरिंदर सिंग यांना भांडताना फक्त एकदाच पाहिले होते. त्यांच्या आई-वडिलांमध्ये कधीकधी वाद व्हायचे, मात्र एकदाच कडाक्याचे भांडण झाले होते, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात आई-वडिलांविषयी बोलताना 1980 सालचा एक किस्साही सांगितला.
अमरिंदर सिंग यांचे गांधी कुटुंबाशी जुने नाते
पटियालाच्या राजघराण्याशी संबंधित असलेले अमरिंदर सिंग यांचे गांधी कुटुंबाशी राजीव गांधी यांच्या काळापासूनचे संबंध आहेत. राजीव गांधी हे त्यांचे शाळेपासूनचे मित्र होते. राजीव गांधी यांनीच त्यांना काँग्रेसमध्ये आणले होते, असे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी भाजपमधील आवडता नेता म्हणून अमरिंदर सिंग यांच्या नावाचा उल्लेख केला होता. यावर अमरिंदर सिंग म्हणाले की, राहुल गांधी कोणत्या काळाविषयी बोलत आहेत हे त्यांना नीट आठवत नाही, मात्र राजीव गांधी यांच्याशी त्यांचे अनेकदा बोलणे व्हायचे.
परतण्याच्या चर्चांवर काय म्हणाले?
कार्यक्रमानंतर अमरिंदर सिंग यांना पंजाबच्या निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सर्व दावे फेटाळून लावले. ते म्हणाले की, मी या कुटुंबाला अनेक वर्षांपासून ओळखतो आणि आमचे कौटुंबिक नाते आहे. मी आता त्यांच्या पक्षात प्रवेश करावा, असे कोणीही विचारले नाही. गांधी कुटुंबाशी माझी सामाजिक विषयावर चर्चा झाली. मी स्वतःचे पुस्तक लाँच केले होते, त्यावेळी सोनिया गांधी स्वतः पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या तीन कार्यक्रमांना हजेरी लावली होती. वेगवेगळ्या देशांतही राजकीय विचारधारा बाजूला ठेवून नेतेमंडळी सामाजिक कार्यक्रमात भेटत असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply