तंत्रज्ञानाने आता माणसांच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रश्नांनाही उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. घरातून निघून गेल्यानंतर अडीच वर्षे ज्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता, अशा एका महिलेचा शोध कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने लागला आहे. या घटनेने तंत्रज्ञानाचा वापर माणुसकीच्या कामासाठीही कसा होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे.
मानसिक तणावामुळे घर सोडले होते
झुलेखा शेख या मानसिक तणावामुळे घरातून निघाल्या होत्या. ३ एप्रिल २०२४ रोजी त्या मुंबईत पोलिसांना आढळल्यानंतर कुर्ला न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पांडूर येथील संविता आश्रमात ठेवण्यात आले होते. हा आश्रम जीवन आनंद संस्थेच्या वतीने चालवला जातो. त्यानंतर त्यांचे कुटुंब कुठे आहे, त्या कुठल्या गावच्या आहेत, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.
एआयच्या मदतीने मूळ गावाचा शोध
जीवन आनंद संस्थेचे ट्रस्टी किसन चौरे आणि त्यांच्या टीमने झुलेखा यांच्याशी सातत्याने संवाद साधला. त्यांच्याकडून त्यांच्या गावाविषयी, कुटुंबाविषयी आणि भूतकाळाविषयी काही तुटपुंजी आणि अस्पष्ट माहिती गोळा करण्यात आली. या माहितीचा आणि काही स्थानिक संकेतांचा आधार घेऊन टीमने चॅटजीपीटी आणि गुगल सर्चचा वापर केला. कृत्रिम बुद्धिमत्तेने या अपूर्ण माहितीचे विश्लेषण करून त्या महिलेचे मूळ गाव परभणी असल्याचे शोधून काढले.
त्यानंतर परभणी येथील निर्भया पथकाच्या पोलिसांच्या मदतीने संस्थेच्या टीमने त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. अडीच वर्षांनंतर कुटुंबीयांशी फोनवर बोलल्यानंतर त्यांचे पती मुखिद शेख ९ नोव्हेंबर रोजी संविता आश्रमात पोहोचले आणि झुलेखा यांना सन्मानाने घरी घेऊन गेले. या घटनेमुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांतून हरवलेली व्यक्ती कुटुंबापर्यंत कशी पोहोचू शकते, याचे उदाहरण समोर आले आहे.
Leave a Reply