नाशिक, ता. १६ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांच्यावरील आरोपांच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने अद्याप चौकशीला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण होऊन अहवाल कधी प्राप्त होणार आणि त्यांना पुन्हा नियुक्ती होणार की नाही, याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
शिक्षक बदली प्रकरणात शिक्षणाधिकारी सामलेटी यांच्याविषयी आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. हा विषय मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याची दखल घेत सीईओ पवार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना रजेवर पाठविले. त्यांच्या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (अध्यक्ष), शिक्षणाधिकारी (योजना) आणि बांधकाम विभाग क्रमांक ३ चे वरिष्ठ सहायक (लिपिक) यांची समिती स्थापन करण्यात आली. समितीने अर्जातील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवाल तयार करण्यासाठी वरिष्ठ सहायक विशाल कामडी यांच्यावर कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, या समितीने अद्याप चौकशी सुरूच केलेली नाही.
अहवाल प्राप्त होऊन त्याची कार्यवाही करण्यास बरेच दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यातच साईलता सामलेटी यांनी हजर होण्याची इच्छा प्रदर्शित केल्याचे समजते. मात्र, त्यांना चौकशी पूर्ण होण्यापूर्वी हजर होण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे साईलता सामलेटी शिक्षणाधिकारी म्हणून पुन्हा पदावर येण्याची शक्यता मावळत चालली आहे.
अतिरिक्त सीईओंची नियुक्ती
जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रतिभा संगमनेरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी सामलेटी यांची चौकशी नवीन अधिकारी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. समितीची चौकशी सुरू झाल्यानंतरच अहवालाची प्रक्रिया पुढे सरकेल आणि त्यानंतरच सामलेटी यांच्या पुन्हा नियुक्तीबाबत निर्णय होऊ शकेल.
Leave a Reply