ऐन हिवाळ्यातच नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अपुऱ्या पावसामुळे चार तालुक्यांतील ४२ गावे आणि ८९ वाड्या अशा एकूण १३१ गाव-वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या गाव-वाड्यांतील ८४ हजार ५०२ नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला ४३ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही स्थानिक पातळीवर अपुऱ्या पावसामुळे नोव्हेंबरच्या मध्यातच पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. देवळा, चांदवड, मालेगाव आणि येवला या चार तालुक्यांतील ग्रामीण भागाला त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने अनेक गाव-वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
४३ टँकर, दिवसाला ८० फेऱ्या
जिल्हा प्रशासनाकडून सध्या ४३ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, दिवसभरात या टँकरच्या ८० फेऱ्या होत आहेत. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने १४ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यापैकी एक विहीर गावासाठी राखीव ठेवण्यात आली असून, उर्वरित १३ विहिरींमधून टँकरमध्ये पाणी भरले जात आहे.
येवला तालुक्यात सर्वाधिक ८२ गाव-वाड्यांना २९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. देवळा आणि मालेगाव तालुक्यात प्रत्येकी २० गाव-वाड्यांसाठी अनुक्रमे ३ आणि ६ टँकर धावत आहेत, तर चांदवड तालुक्यातील ९ गाव-वाड्यांसाठी ५ टँकरची व्यवस्था आहे.
डिसेंबरमध्ये संकट अधिक गडद होण्याची भीती
दरम्यान, डिसेंबरमध्ये एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. वाढते तापमान आणि पाण्याची घटती उपलब्धता यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन मागणीनुसार टँकर उपलब्ध करून देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.
Leave a Reply