मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक केल्यानंतर किंवा अज्ञात ॲप डाउनलोड केल्यानंतर बँक खात्यातील रक्कम क्षणात गायब होण्याचे प्रकार पुण्यात वाढले आहेत. गेल्या १५ दिवसांत मोबाईल हॅक करून आणि त्याचा रिमोट ॲक्सेस मिळवून ११ नागरिकांची सुमारे ७६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. स्वारगेट, वाघोली, लोहगाव, कोंढवा, कोथरूड, विमानतळ आणि भारती विद्यापीठ परिसरातील नागरिक या फसवणुकीला बळी पडले आहेत.
सायबर चोरटे आता नागरिकांच्या मोबाईलचा तांत्रिक ताबा मिळवत आहेत. आरटीओचे ई-चलन, थकीत गॅस बिलाचा संदेश आणि मोफत चित्रपटांच्या जाहिरातींचे आमिष दाखवून नागरिकांना बनावट एपीके फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले जाते. ही फाईल फोनमध्ये इन्स्टॉल होताच चोरट्यांना मोबाईलचा ताबा मिळतो. त्यानंतर नागरिकांचे कॉल आणि बँकेचे ओटीपी परस्पर दुसऱ्या क्रमांकावर पाठवून बँक खाती रिकामी केली जातात.
असा रचला जातो सापळा
व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे आरटीओ ई-चलन आणि गॅस बिल अपडेट करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवली जाते. त्या लिंकवरून एपीके फाईल डाउनलोड करण्यास सांगितले जाते. फोन हॅक झाल्यानंतर चोरटे मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतात आणि बँकेचे सर्व ओटीपी व कॉल स्वतःच्या क्रमांकावर पाठवून पैसे काढतात.
वाघोलीतील एका कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिला अकाउंटंटचा मोबाईल हॅक झाल्याचे एक उदाहरण समोर आले आहे. फोनचा ताबा मिळवताच चोरट्याने कंपनीच्या संचालकांच्या भावाचा क्रमांक डिलीट करून त्या जागी स्वतःचाच मोबाईल क्रमांक त्याच नावाने सेव्ह केला. त्यानंतर व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून १६ लाख रुपये एका बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले. मालकाच्या भावाचाच निरोप समजून अकाउंटंटने ती रक्कम पाठवली. काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर घटना आणि बचावाचे उपाय
लोहगावात एपीके फाईलद्वारे १२ लाख रुपये आणि रिमोट ॲक्सेसद्वारे साडेसात लाखांची फसवणूक झाली. विमानतळ परिसरात एका महिलेच्या मोबाईलमध्ये एपीके फाईल पाठवून आठ लाख ७० हजार रुपये काढले गेले. स्वारगेटमध्ये बनावट ई-चलन ॲपद्वारे एका व्यावसायिकाला सहा लाख ८१ हजार रुपयांचा गंडा घातला गेला. भारती विद्यापीठ परिसरात गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली सव्वासहा लाख आणि वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे साडेतीन लाख रुपये लंपास झाले. कोंढव्यात गॅस बिलाच्या संदेशाद्वारे एका ज्येष्ठ नागरिकाचे सहा लाख रुपये लंपास झाले.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. विशेषतः ‘.apk’ एक्स्टेंशन असलेल्या फाईल्स डाउनलोड करू नयेत. प्ले-स्टोअर किंवा ॲप-स्टोअर व्यतिरिक्त इतर कोणत्याही लिंकवरून ॲप डाउनलोड करू नये. आरटीओ चलन किंवा गॅस बिलाची खात्री अधिकृत संकेतस्थळ किंवा ॲपवरच करावी. फोन हॅक झाल्याचा संशय आल्यास इंटरनेट बंद करावे आणि बँक खात्याचा व यूपीआय पासवर्ड त्वरित बदलावा. मोबाईल हॅक झाला आहे का हे पाहण्यासाठी *#६७# डायल करता येते, तर हॅक काढून टाकण्यासाठी ##००२# डायल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Leave a Reply