मुरबाड तालुक्यातील माळ येथे आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सागरी भूमिपुत्र महासंघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या संघर्षाचे स्मरण करण्यात आले.
शेतकरी उद्योजक मेळावा
यानिमित्त आयोजित शेतकरी उद्योजक मेळाव्यात आदिवासी शेतकरी आणि ग्रामीण समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शेतकऱ्यांनी केवळ शेती उत्पादनापुरते मर्यादित न राहता उद्योजक बनावे, यासाठी शेतकरी गट स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले.
सामूहिक शेतीतून समृद्धीचा ध्यास
पेसा क्षेत्रातील व्यवसाय संधी, शासकीय योजना, सामूहिक शेती, शेतमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ उपलब्धता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. सागरी भूमिपुत्र महासंघाच्या मुरबाड तालुका समन्वयक डॉ. कविता वरे-भालके यांनी शेतकऱ्यांनी संघटित होऊन स्थानिक संसाधनांचा वापर करावा आणि शेतीपूरक लघुउद्योग उभारावेत, असे आवाहन केले. सामूहिक प्रयत्नांतून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संयोजन सविता शिंदे आणि समाजसेवक जयराम उघडा यांनी केले. या वेळी स्थानिक शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply