धाराशिव : जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर आपल्या पशुधनाचा सांभाळ करण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तत्काळ चारा डेपो मंजूर करून जनावरांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी युवासेनेच्या (यूबीटी) वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.
चारा संपल्याने शेतकरी हवालदिल
जिल्ह्यात यंदा दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, शेतकऱ्यांकडे असलेला तुटपुंजा चारा आता संपुष्टात आला आहे. महागडा चारा विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने तातडीने चारा डेपो सुरू न केल्यास शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपले पोटच्या पोरांसारखे सांभाळलेले पशुधन कवडीमोल भावाने विकण्याची वेळ येईल, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
आधीच नापिकी आणि दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर पशुधन विक्रीचे नवे संकट ओढवू नये, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना कोण उपस्थित होते
निवेदन देताना युवासेना तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी सरडे, पंचायत समिती सदस्य राजदीप गायकवाड, खेडचे सरपंच नाना गरड, अमोल मुळे, सत्यजीत पडवळ, सिद्दीक तांबोळी, विनोद गायकवाड, किशोर साळुंखे आदी उपस्थित होते.
Leave a Reply