धाराशिव शहरातील कचरा डेपो शहराबाहेर स्थलांतरित करावा, तसेच अस्वच्छता, तुंबलेल्या गटारी आणि दुर्गंधीच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, या मागण्यांसाठी काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने १६ नोव्हेंबरपासून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील सध्याच्या कचराडेपोमुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. याशिवाय आठवडी बाजारातील अस्वच्छता, दैनंदिन स्वच्छतेचा अभाव, ठिकठिकाणी तुंबलेल्या गटारी आणि नाल्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
पाच ठिकाणी स्वाक्षरी फलक
या पार्श्वभूमीवर कचरा डेपो शहराबाहेर योग्य ठिकाणी हलविणे, आठवडी बाजाराची नियमित स्वच्छता करणे, दैनंदिन स्वच्छतेकडे लक्ष देणे, तुंबलेल्या गटारी व नाल्यांची सफाई करणे आदी मागण्यांसाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक, धारासुरमर्दिनी कमान, शम्स चौक, गणेशनगरजवळील मसोबा चौक आणि शांतिनिकेतन कॉर्नर या पाच ठिकाणी स्वाक्षरी फलक लावण्यात येणार आहेत. नागरिकांनी या फलकांवर स्वाक्षरी करून मोहिमेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन शासन आणि प्रशासनाला सादर करून स्वच्छतेच्या प्रश्नांवर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे. ही मोहीम पक्षापुरती मर्यादित नसून शहराच्या हिताची आणि नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असल्याने सर्वांनी पक्षभेद बाजूला ठेवून सहभागी व्हावे, असे काँग्रेसच्या शहर शाखेने म्हटले आहे.
Leave a Reply