पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहीर खोदकाम सुरू असताना दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळून झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी मध्यरात्री एक वाजता घटनास्थळी भेट देऊन शोधकार्याचा सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली.
चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले
विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने चार कामगार त्याखाली अडकले होते. माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, अग्निशमन दल तसेच संबंधित बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दुर्घटनेत रांझणी येथील सिद्धेश्वर घाडगे आणि मंगेश मोरे हे दोन कामगार मृतावस्थेत आढळून आले, तर अनवली येथील अन्य दोन कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते.
कुटुंबीयांचे सांत्वन, चौकशीचे निर्देश
पालकमंत्री गोरे यांनी मध्यरात्री घटनास्थळी पोहोचल्यानंतर बचावकार्यातील अडचणी, उपलब्ध यंत्रणा, शोधकार्याची प्रगती आणि पुढील कार्यवाही याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी असून मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या अनेक ठिकाणी विहिरींची कामे सुरू आहेत. परवानगी घेऊन सुरू असलेल्या तसेच विनापरवाना खोदण्यात येणाऱ्या विहिरींची माहिती प्रशासनाने संकलित करावी. सर्व विहीर खोदकामांमध्ये सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याची तपासणी करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विहीर खोदकामासाठी आवश्यक प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती का, ब्लास्टिंग करण्यास परवानगी होती का, तसेच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता काम सुरू असेल, तर ती गंभीर बाब आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लारवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply