मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कुंभ म्हणजे तत्त्वज्ञानाचे पूर्णत्व: प्रणव गोखले

नाशिकमध्ये ज्ञानकुंभ व्याख्यानमालेत प्रणव गोखले यांनी कुंभपर्वाचे महत्त्व उलगडले. कुंभ हे पावित्र्य, पूर्णत्व आणि अमृतत्वाचे प्रतीक असल्याचे सांगितले.

कुंभ म्हणजे तत्त्वज्ञानाचे पूर्णत्व: प्रणव गोखले

कुंभमेळ्यातील स्नानाचे आणि पूजेचे श्रेय त्यांनाच मिळते, ज्यांची कुंभपर्वाच्या पावित्र्यावर श्रद्धा आणि भक्ती असते, असे मत ज्येष्ठ अभ्यासक प्रणव गोखले यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये ‘आयाम’ संस्थेतर्फे आयोजित ज्ञानकुंभ व्याख्यानमालेत ‘कुंभपर्वाचा परिचय’ या विषयावर ते बोलत होते. शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात हे व्याख्यान झाले.

कुंभ म्हणजे राष्ट्राचे एकत्रीकरण

कुंभपर्व हे पावित्र्य, पूर्णत्व आणि अमृतत्व अशा संकल्पनांचे प्रतीक असून संपूर्ण राष्ट्राच्या एकत्रीकरणाचे कार्य म्हणजे कुंभमेळा होय, असे गोखले म्हणाले. चार तीर्थक्षेत्रे, त्यांचे ग्रहयोग, खगोलशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान तसेच पर्यावरणीय आणि भौगोलिक दृष्टिकोन स्पष्ट करताना त्यांनी कुंभपर्वाचे आजच्या जीवनातील महत्त्व आणि त्याच्याशी असलेला संबंध समजावून सांगितला. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ या उक्तीप्रमाणे कुंभपर्वातून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार काही ना काही प्राप्त होते, असेही ते म्हणाले.

सिंहस्थ आणि कुंभ यांतील फरक

‘सिंहस्थ’ पर्वाचा अर्थ आणि स्वरूप तसेच कुंभमेळा आणि सिंहस्थ यांमधील फरक गोखले यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता आणि आदि शंकराचार्य यांच्या प्रतिमापूजनाने झाली. धनलक्ष्मी पटवर्धन यांनी गीत सादर केले. प्रास्ताविकात ‘आयाम’, नाशिकचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर यांनी सतत ज्ञानग्रहण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सांगता आभारप्रदर्शनाने झाली.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance