निमगाव येथील टीकेआरएच माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सन २००३ मधील बारावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेत उत्साहात पार पडला. तब्बल २३ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांची शाळा पुन्हा एकदा भरली. या वेळी मित्रांसोबत केलेल्या खोड्या आणि जुन्या आठवणींना उजाळा देत हास्यविनोद झाले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जुने सवंगडी एकत्र आले. कार्यक्रमाला तत्कालीन शिक्षकांनाही निमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी निवृत्त प्रा. एन. सी. रंगी व प्रा. रवींद्र मोरे होते. त्यांनी मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे निष्ठा ठेवून आपले कार्य करीत राहावे, आई-वडिलांची सेवा करावी आणि शाळेला मदत करावी, असे आवाहन प्रा. रंगी यांनी केले. देशासाठी, गावासाठी आणि समाजासाठी आपण कायम तत्पर राहावे, गरिबांना मदत करावी, धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि आपल्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे, असे आवाहन प्रा. मोरे यांनी केले.
गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा निर्धार
अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश महाले, योगेश बच्छाव, भरत देवरे, दीपक देवरे, संदीप सरावत, योगेश आहीरे, सचिन दैतकार, रीना साळुखे, रिंकू भालेराव, शीतल खैरनार, कविता शेवाळे, सरोज खैरनार, माधुरी हिरे आणि मनीषा हिरे यांच्या पुढाकारातून माजी विद्यार्थ्यांचा हा मेळावा झाला. या वेळी सर्वांनी आपला परिचय करून दिला. आगामी काळात मेळावा घेऊन गरीब विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्धार करण्यात आला. रूपाली गोलाईत यांनी प्रास्ताविक केले, सरोज खैरनार यांनी स्वागत केले, शिवचरण आहिरे यांनी सूत्रसंचालन केले आणि वृषाली हिरे यांनी आभार मानले.
Leave a Reply