केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त आज रविवारी आणि उद्या सोमवारी पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
या रस्त्यांवर वाहने लावण्यास मनाई
लोहगाव येथील हवाई दलाचा तळ ते विमाननगर रस्ता, रामवाडी ते भारत फोर्ज कंपनी, मुंढवा या रस्त्यावर दोन्ही दिवस सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथील नॉर्थ मेन रोड, जहांगीर हॉस्पिटल चौक, अभियांत्रिकी महाविद्यालय चौक, नेहरू मेमोरियल चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), वेधशाळेजवळ खुडे चौक, संगमवाडी ते येरवड्यातील शाहदावलबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते गोल्फ क्लब रस्ता, ५०९ चौक ते लोहगाव येथील हवाई दलाचा तळ या रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त भाजीभाकरे यांनी दिली.
सोमवारच्या कार्यक्रमासाठी विशेष व्यवस्था
अमित शहा यांच्या उपस्थितीत सोमवारी सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने सोमवारी सकाळी नऊनंतर कार्यक्रम संपेपर्यंत टिळक रस्ता, महाराष्ट्र साहित्य परिषद, बादशाही हॉटेल, भरत नाट्य मंदिर परिसरात वाहने लावण्यास मनाई असेल.
सकाळी सातनंतर किराड चौक ते नेहरू मेमोरियल हॉल चौक हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात येईल. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांनी किराड चौक येथून जीपीओमार्गे हॉटेल ब्लू नाईल चौकात जावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
जिल्हा परिषद परिसर मार्गावर वाहतूक बंद
पुणे जिल्हा परिषद परिसरातील दोराबजी मॉल ते हॉटेल ब्लू नाईल चौक हा मार्ग वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त एसजीएस मॉल, पूना क्लब, लेडीज क्लब, किराड चौक, पुणे पोलिस आयुक्तालय परिसरातील गल्ली, इस्कॉन मंदिर, ब्लू नाईल चौक येथे वाहने लावावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
Leave a Reply